बुलेट ट्रेन: १५२.१० हेक्टर जमीन संपादित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:30+5:302021-07-23T04:21:30+5:30
या प्रकल्पाच्या संदर्भानेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बाधित क्षेत्रातील शेतकरी तथा काही जाणकारांची जनसुनावणी घेण्यात आली. समृद्धी महामार्गासाठी संपादित ...

बुलेट ट्रेन: १५२.१० हेक्टर जमीन संपादित करणार
या प्रकल्पाच्या संदर्भानेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बाधित क्षेत्रातील शेतकरी तथा काही जाणकारांची जनसुनावणी घेण्यात आली. समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनी संदर्भाने शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव तथा या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचा रेडीरेकनर दर, प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नेमका काय लाभ मिळाले यासंदर्भातील प्रश्नांवरही यावेळी चर्चा झाली. सोबतच पाण्याचे स्त्रोत, पर्यावरण संवर्धन या मुद्यांवर चर्चा करण्यात येऊन त्याचा समावेश सविस्तर अहवालामध्ये करण्यात येणार आहे. अद्याप बुलेट ट्रेन संदर्भातील डिपीआर हा प्राथमिक स्तरावर असून एक प्रकारे बुलडाण्यातील जन सुनावणीच्या आधारे त्याचा श्रीगणेशा झाला आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन संदर्भातील ही पहिलीच जनसुनावणी असल्याने त्यास एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रामुख्याने पर्यावरण व सामाजिकस्तरावर पडणाऱ्या प्रभावाबाबत जीपीएस टेक्नॉलॉजीज आणि नोनार्क सर्व्हेअर्स ॲन्ड अभियांत्रिकीच्या सहकार्याने ही जनसुनावणी झाली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे सामाजिक विकास विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक श्याम चौगुले प्रामुख्याने या बैठकीस उपस्थित होते.
--मेहकरचा थांबा मध्यवर्ती ठिकाणी--
७३९ किमी लांबीच्या या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये मेहकर येथील थांबा हा मध्यवर्ती ठिकाणी येत आहे. त्यामुळे त्यास एक महत्त्व प्राप्त झाले आहे. हा थांबा नागपूरकडून येतांना सातव्या तर ठाण्याकडून येताना आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे याचे महत्त्व येत्या काळात वाढणार आहे. त्यामुळे येथे बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी जवळपास २५ मीटरची जागा संपादित करावी लागेल. बुलेट ट्रेनचा ट्रॅक हा समृद्धीला समांतर जाणार असून तो १९ मीटर अर्थात ५८ फूट जागा व्यापणारा राहील.
--चार तालुक्यातून जाणार--
समृद्धीलगत समांतर असा ५८ फुटांचा बुलेट ट्रेनचा ट्रॅक जाणार असून मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील ४७ गावातून ८७ किमीचा हा ट्रॅक जाईल. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील १५२.१० हेक्टर जमीन संपादित होईल. त्यात खासगी जमीन १८ हेक्टर, सरकारी जमीन १३४.१० हेक्टर राहील. यात बाधित होणाऱ्या भूखंडाची संख्या ही १ हजार १७८ राहील.