Buldhana: काेतवाल परीक्षेत आढळला डमी उमेदवार, पर्यवेक्षकांच्या समयसुचकतेने प्रकार उघडकीस
By संदीप वानखेडे | Updated: October 22, 2023 21:27 IST2023-10-22T21:26:55+5:302023-10-22T21:27:12+5:30
Exam Copy News: विविध स्पर्धा परीक्षांमध्ये डमी उमेदवार आढळल्याचे प्रकार राज्यभरात समाेर आले हाेते़ त्यानंतर बुलढाण्यातही काेतवाल पदाच्या परीक्षेसाठी चक्क डमी उमदेवारच परीक्षा देण्यासाठी आला हाेता.

Buldhana: काेतवाल परीक्षेत आढळला डमी उमेदवार, पर्यवेक्षकांच्या समयसुचकतेने प्रकार उघडकीस
- संदीप वानखडे
बुलढाणा - विविध स्पर्धा परीक्षांमध्ये डमी उमेदवार आढळल्याचे प्रकार राज्यभरात समाेर आले हाेते़ त्यानंतर बुलढाण्यातही काेतवाल पदाच्या परीक्षेसाठी चक्क डमी उमदेवारच परीक्षा देण्यासाठी आला हाेता़ एवढेच नव्हे तर त्याने बनियनला खिसा शिवून त्यामध्ये माेबाइल आणला हाेता़ पर्यवेक्षकांना संशय आल्याने त्याची झाडाझडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला़ या प्रकरणी आराेपी युवकाविरुद्ध बुलढाणा शहर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदिर या परीक्षा केंद्रावर ५६७ परीक्षार्थी पेपर देणार होते़ परंतु परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्षात ५४३ उमेदवार हजर होते. या केन्द्रावरील रूम नंबर २० मध्ये हिवताप कार्यालयातील लिपिक मनोज जगताप हे परीक्षा समवेक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत होते. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना वेळेच्या आत उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले़ परंतु गणेश भगवान चनखोरे असा हॉल टिकीट घेऊन एक उमेदवार एन वेळेवर आला व परीक्षा देण्यास सुरुवात केली़ त्याच्या हालचालीवर समवेक्षक मनोज जगताप यांना संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली असता त्याने बनियानमध्ये खिसा शिवून त्यात मोबाइल लपवून आणला होता़ जेव्हा त्याचे हॉल टिकीट तपासले असता त्यावर फोटो दुसऱ्या व्यक्तीचा होता. त्याला पकडून केंद्र संचालक यांच्याकडे आणले असता त्याने आपले नाव विजयसिंह महासिंह सुंदरडे रा. राजेवाडी, ता़ बदनापूर, जि.जालना असे सांगितले.या प्रकरणी आराेपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास एपीआय जयसिंग राजपूत करीत आहेत़