खामगाव (बुलढाणा): गावातील समस्या सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाची हाक दिली. आंदोलन करायला पूर्णानदीच्या काठावर गेले. प्रशासनाचे अधिकारी आणि आंदोलक यांच्यात समस्या सोडवण्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच एका आंदोलकाने पाणी पातळी वाढलेल्या पूर्णानदी उडी घेतली. आंदोलक सगळ्यांसमोर वाहून गेला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याच्या शोधासाठी पथके बोलावण्यात आली असून, शोध सुरू आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द गावातील ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत असून, त्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. घरांसाठी कमी मोबदला, दोन वर्षात गावठाणात प्लॉट देण्याऐवजी २०२३ मध्ये दिले गेले. २०१६ जी रक्कम मोबादला म्हणून दिली गेली, त्यात घर घेणं शक्य नाही. त्याचबरोबर नवीन गावठाण तयार होत असताना ठेकेदार व सरकारी अधिकारी यांच्या संगनमताने गावठाणातील कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
त्यातच नवीन गावठाणाची जागा निश्चित करीत असताना जो रस्ता गृहीत धरून जागा निश्चित केल्या गेली, तोच रस्ता दुसरीकडे हलवण्याचा घाट प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घातला आहे. एकाच प्रकल्पातील इतर गावांना वेगळा न्याय व आडोळ खुर्द गावाला वेगळा न्याय दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत असून, याविरोधात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला गेला होता.
पूर्णा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन
दरम्यान, शुक्रवारी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी कुटुंबातील सदस्यांसह पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. सकाळी दहा वाजतापासून ग्रामस्थ येण्यास सुरूवात झाली. आडोळमधील लोक कुटुंबासह आंदोलन स्थळी आले.
प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असतानाच घेतली उडी
जलसमाधी आंदोलन सुरू असतानाच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रकल्प अधिकारी यांच्यात चर्चा व त्यानंतर थोडी बाचाबाची झाली. याच वेळी गौलखेड येथील विनोद पवार या व्यक्तीने प्रशासनाचा निषेध म्हणून थेट पूर्णा नदी पात्रातच उडी मारली. आंदोलनकर्त्याने अचानक नदीत उडी मारल्याने खळबळ माजली.
अचानक ही घटना घडली. यावेळी कोणतीही व्यवस्था तिथे केलेली नव्हती. त्यामुळे तो सर्वांसमोरच वाहून गेला. दुपारी तीन वाजेपर्यंत सुद्धा सदर व्यक्ती दिसून न आल्याने प्रशासनाने एनडीआरएफच्या विशेष पथकाला पाचारण करून त्याचा शोध सुरू केला.
प्रशासनाच्या वतीने शोध कार्य सुरू असून, आंदोलकही आक्रमक झाले आहेत. संतापलेल्या आंदोलकांनी एका प्रकल्प अधिकाऱ्याला मारहाण केल्याची माहिती असून, आमदार संजय कुटे हे घटनेची माहिती मिळताच गावात दाखल झाले.