बुलडाणा, चिखलीत वाढीव विद्युत देयकांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:38 IST2020-07-13T19:36:56+5:302020-07-13T19:38:00+5:30
महावितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली.

बुलडाणा, चिखलीत वाढीव विद्युत देयकांची होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या-सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली.
लॉकडाऊन काळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजिबले देण्यात आले आहे. राज्यभरात वीजिबलांचा मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, १३ जूलै रोजी रविकांत तुपकर यांचे नेतृत्वात बुलडाण्यात वीजबिलांची होळी करण्यात आली. महावितरणच्याप्रवेश द्वारासमोर प्रचंड नारेबाजी करत वीजबिलांची होळी करून आंदोलकांनी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्या मार्फत उर्जामंत्री ना.नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अधिक्षक अभियंता यांना वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र संतापाची कल्पना दिली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. एप्रिल महिन्यापासून ५ ते १५ टक्के बिलामध्ये वाढ झालेली आहे. एकूण तीन महिन्याचे युनिट बिलामध्ये समाविष्ठ झाल्याने जादा युनिटचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व लघुव्यवसाय बंद होते. अनेकांचे दुकाने बंद असतानाही त्यांना वाढीव बिले आली आहेत. लॉकडाऊन काळातील विद्युत देयके माफ करण्याची मागणी करण्यात आली.
चिखली तहसिलसमोर आंदोलन
चिखली: स्थानिक तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विजबिलांची होळी करु न आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीने घरगुती व लघु व्यावसायिकांच्या वीज बिलांमध्ये दरवाढ केली. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने ही वीज बिले भरणे शक्य नाही. वीज बिल माफ करण्यात यावी या मागणीसंदर्भाने यावेळी नारेबाजी देखील करण्यात आली. तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. बिले माफ केली नाही तर महावितरणचे कार्यालयही जाळू, असा गंभीर इशाराही देण्यात आला.