लोहारानजीकचा ब्रिटीशकालीन पूल खचला, वाहन लटकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 19:50 IST2021-06-11T19:49:35+5:302021-06-11T19:50:34+5:30
जिवितहानी नाही : ब्रिटिश कालीन पुलाला झाले १०० वर्षे, वाहतूक अकोला मार्गे वळवली

लोहारानजीकचा ब्रिटीशकालीन पूल खचला, वाहन लटकले
शेगाव : अकोट राज्यमार्गावर असलेला इंग्रजकालीन पूल शुक्रवारी सकाळी खचला. नेमके त्याचवेळी कोंबड्यांची वाहतूक करणारे एक वाहन पुलावरून जात होते. अचानक पुलाला भगदाड पडल्याने क्षणात आत वाहन खड्यात घसरून अधांतरी लटकले.
बुलडाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर लोहारा गावाजवळ मन नदीवर सुमारे १०० वर्षांपुर्वीचा इंग्रजकालीन पूल आहे. याच परिसरात कवठा बॅरेज तयार करण्यात येत असून नदीपात्रात जास्त पाणी थांबविल्या जाणार असल्याने जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. नवीन पूल तयार करीत असतांना कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळ खोदकाम केल्याने जुना पूल खिळखिळा झाला. त्यातच शुक्रवारी सकाळी या पुलावरून एक वाहन कोंबड्या घेऊन जात असतांना पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला. यामुळे वाहन घसरून अधांतरीच लटकले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. घटनेनंतर जेसीबीच्या साह्याने वाहन बाहेर काढण्यात आले. मात्र, पुलाचा एक भाग ढासळल्याने या राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.