सिंदखेड राजातील ५० कोटींच्या गुंतवणुकीला ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 11:03 AM2021-05-26T11:03:31+5:302021-05-26T11:03:50+5:30

Sindkhed Raja : ५० कोटी रुपयांच्या टिश्यू कल्चर प्रोजेक्टला वीज पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मोठा फटका बसत आहे

Break to Rs 50 crore investment in Sindkhed Raja? | सिंदखेड राजातील ५० कोटींच्या गुंतवणुकीला ब्रेक?

सिंदखेड राजातील ५० कोटींच्या गुंतवणुकीला ब्रेक?

Next

- मुकुंद पाठक
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: केंद्र सरकारचे मेक इन इंडिया अंतर्गत उद्योगांना उभारी देण्याचे धोरण असले तरी सिंदखेड राजा येथे स्थापन केलेल्या ५० कोटी रुपयांच्या टिश्यू कल्चर प्रोजेक्टला वीज पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे आणखी ५० कोटी रुपये खर्च करून येथे उभारण्यात येणाऱ्या ईश्ववेद फूड प्रोसेसींग प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीलाच ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
सिंदखेड राजाचे भूमीपुत्र तथा ईश्ववेद उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी या अडथळ्याच्या शर्यतीमुळे सिंदखेड राजात उभारण्यात येणारा खाद्य प्रक्रिया उद्योग अन्यत्र हलविण्याची मानसीकता दाखविली आहे. वास्तविक त्यांनी २०१४ मध्ये मोठी गुंतवणूक करून सिंदखेड राजा येथे ईश्ववेद बायोटेक नावाने टिश्यू कल्चर प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सिंदखेड राजातील २०० व परिसरातील २०० अशा ४०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला; मात्र वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या समस्येमुळे या उद्योगाला येथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिंदखेड राजात सुरू करावयाचा नवीन खाद्य प्रक्रिया उद्योग ते अन्यत्र उभारणार आहेत.
अैाद्योगिकदृष्ट्या डी प्लसमध्ये असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मलकापूर व काही प्रमाणात चिखली येथे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे सिंदखेड राजा येथे उद्योग उभारल्या जात असेल तर तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पच ठरावा. पण येथे केलेल्या गुंतवणुकीचा अभिमान बाळगावा की मनस्ताप सहन करावा, अशी मानसीकता सध्या संजय वायाळ यांची बनली आहे. कारण ‘ईश्ववेद’ साठी वीज वितरण कंपनीकडून स्वतंत्र फिडर मिळावे, यासाठी वायाळ यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र एक्स्प्रेस फिडर सोडा पण विजेच्या वाढत्या फ्लकचुवेशनचा मोठा फटका सध्या कार्यरत असलेल्या टिश्यू कल्चर उद्योगाला बसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतरही प्रश्न सुटण्याऐवजी त्यांच्या अनाकलनीय उत्तरांनी मनस्ताप होत असल्याचे वायाळ यांचे म्हणणे आहे. टिशू कल्चर प्रकल्प मोठ्या उत्साहाने इथे आणला पण आगामी फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट आपण सिंदखेडराजा येथे स्थापन करणार नसल्याचे ते म्हणाले.


प्रोजेक्ट अन्यत्र उभारणार
या प्रोजेक्टसाठी ५० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून या द्वारे शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता, तर ५ हजार शेतकऱ्यांना यात सामावून घेण्याची क्षमता होती; परंतु महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्याला हा प्रोजेक्ट येथे स्थापन करणे शक्य नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया ईश्ववेद व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली आहे.


ईश्ववेद कंपनीला वीज कनेक्शन गावठाण फिडरवरून आहे. या फिडरवर १३ गावांना वीज पुरवठा आहे.  या गावात वीजेसंदर्भात कुठेही अडचण आल्यास संपूर्ण वीज पुरवठा खंडित करावा लागतो. त्यामुळे कंपनीला खंडित वीज पुरवठ्याच्या अडचणीला सामोरे जावे लागते. कंपनी असलेला भाग हा औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे तेथे आवश्यक वीज सुविधा नाहीत. अखंडित वीज पुरवठा हवा असल्यास त्यांना एक्स्प्रेस फिडर स्वतः च्या खर्चातून घ्यावे लागणार आहे. त्यांनी तसा प्रस्ताव दिल्यास वीज कंपनी संपूर्ण सहकार्य करेन.
- ए. एम. खान उपअभियंता, महावितरण कंपनी, सिंदखेड राजा

Web Title: Break to Rs 50 crore investment in Sindkhed Raja?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.