रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार
By Admin | Updated: September 28, 2014 23:30 IST2014-09-28T23:30:47+5:302014-09-28T23:30:47+5:30
खामगाव तालुक्यातील बेलुरा येथील ग्रामस्थांचा इशारा

रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार
खामगाव (बुलडाणा): तालुक्यातील बेलुरावासीयांनी गावाला पक्का रस्ता नसल्याने होणार्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे.
बेलुरा या गावाला पक्क्या रस्त्याने जोडण्यात आलेले नाही. रस्ता कामाचे भूमिपूजन होऊन फलकही लावण्यात आले; मात्र साधे खडीकरणसुद्धा झाले नाही. गावात इयत्ता चौथीपर्यंंतच शाळा असल्याने तसेच वैद्यकीय सुविधा नसल्याने तर शेतकर्यांना शेतमाल विक्रीसाठी पिंपळगाव राजा अ थवा खामगाव येथे रोज येणे-जाणे करावे लागते. मात्र पावसाळय़ात
बेलुरागावाचा संपर्क तुटलेला असतो. रस्त्याचे खडीकरण व्हावे या करिता वेळोवेळी लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी यांच्याकडे लेखी तसेच तोंडी स्वरूपात निवेदने केलेली आहेत; परंतु आजपावेतो सदर रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे मजबुतीकरण करण्यात आले नाही. लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी सदर रस्त्याच्या मजबुतीकरणाकरिता अथवा खडीकरणाकरिता भूमिपूजनाचे सोहळे केलेले असून, त्याबाबतचे फलकसुद्धा लावण्यात आले होते. तसेच सदर रस्त्याकरिता २0 लक्ष रुपये मंजूर झाल्याचे समजते; मात्र सदर रस्त्याचे खडीकरण अद्यापपावेतो झालेले नाही. त्यामुळे याची चौकशी व्हावी तसेच गावाला रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर आदींच्या सहय़ा आहेत.