अल्पवयीन मुलीसह मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 15:01 IST2020-05-07T14:59:40+5:302020-05-07T15:01:05+5:30
२० वर्षीय मुलगा व अल्पवयीन मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी पार्डा दराडे शिवारातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

अल्पवयीन मुलीसह मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
देऊळगाव कुंडपाळ : अजिसपूर येथील २० वर्षीय मुलगा व अल्पवयीन मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी पार्डा दराडे शिवारातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलाने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी लोणार पोलिस स्टेशनला नोंदवली असल्याची माहिती मिळाली. अजिसपूर येथील सचिन मधूकर साळवे (२०) मजुरीचे काम करीत होता. तर अल्पवयीन मुलगी गावातील जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकत होती. बुधवारी गावातील काही जणांनी त्यांनी शेतात फिरतांना बघितले होते. कुठे जात आहात, अशी विचारणाही केली होती. दरम्यान गुरुवारी सकाळी पार्डा दराडे येथील उद्धव दराडे शेतातील विहिरीवर मोटारपंप सुरु करण्यासाठी गेल्यावर त्यांना विहिरीच्या काठावर चप्पल, बुट, ओढणी दिसून आली. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी लगेच लोणार पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस कॉन्स्टेबल झोटे, बोरे, निकम, पवार घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची पाहणी करुन मृतदेह बाहेर काढण्यात आले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणार येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.