बेपत्ता चुलत बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 20:43 IST2018-03-25T20:43:10+5:302018-03-25T20:43:10+5:30
दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मेहकर तालुक्यातील पारडा येथील दोन चुलत बहिणींचे मृतदेह चौंढी शिवारातील एका विहीरीत २५ मार्च रोजी आढळून आले आहेत.

बेपत्ता चुलत बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले
मेहकर : दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मेहकर तालुक्यातील पारडा येथील दोन चुलत बहिणींचे मृतदेह चौंढी शिवारातील एका विहीरीत २५ मार्च रोजी आढळून आले आहेत. प्रकरणी माजी पोलिस पाटील रामदास कावरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी जलदगतीने प्रकरणाचा तपास सुरू
केला आहे.
पारडा येथील सिमा जगन्नाथ पवार (१६) आणि करीना मोहन पवार (८)) दोघी चुलत बहिणी दोन दिवसापूर्वी शेळ््या चारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या सायंकाळी घरी परत आल्याच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला होता मात्र त्या सापडल्या नाही. चौढी शिवारात दत्ता सखाराम कावरे यांच्या विहिरीमध्ये सिमा आणि करीना यांचे मृतदेह असल्याचे २५ मार्च रेजी उघडकीस आले. करीना ही पारडा येथे दुसर्या वर्गात शिकत होती. या दोन्ही मुली विहिरीत कशा पडल्या ही बाब स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे घातपाताचा संशय
व्यक्त होत असून त्याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पंढरीनाथ गिते करीत आहेत. पोलिसांनी प्रकरणी आकस्मिक
मृत्यूची नोंद केली आहे.
शवविच्छेदन करण्यात अडचण
दोन्ही मुलींचे मृतदेह जवळपास दोन दिवस विहीरीत असल्याने मेहकर येथे शवविच्छेदन करण्यात अडचण येत होती. त्यामुळे हे दोन्ही मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर हा प्रकार नेमका कसा घडला याची माहिती मिळण्याचा पोलिसांना अंदाज आहे.