मधमाशांच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जागीच ठार; खामगावकडे येताना अंत्रज गावालगतच रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 20:08 IST2023-02-19T20:06:49+5:302023-02-19T20:08:15+5:30
गावापासून तीन किमीपेक्षा अधिक अंतर कापल्यानंतर गारडगाव नजिक सिंधी नाल्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला.

मधमाशांच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जागीच ठार; खामगावकडे येताना अंत्रज गावालगतच रस्त्यावरील घटना
खामगाव : काही कामानिमित्त चिखली-खामगाव रस्त्याने अंत्रज गावातून खामगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वार शेतकऱ्यावर मधमाशांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा रस्त्यावर जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या गाडीने पाण्याचे फवारे सोडल्यानंतरही मधमाशांनी दुचाकीस्वाराला दंश करणे सोडले नाही. तसेच त्यांच्यावरही हल्ला केला.
खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील शेतकरी जगन्नाथ नामदेव देवळे (५८) हे रविवारी सकाळी ९.३० वाजता गावातून खामगावकडे येण्यासाठी निघाले. गावापासून तीन किमिपेक्षा अधिक अंतर कापल्यानंतर गारडगाव नजिक सिंधी नाल्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्यामध्ये ते जागीच कोसळले. रस्त्यावर मधे पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याला मधमाशांनी शेकडो दंश केले. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यानंतरही तब्बल दोन तासांपेक्षाही अधिक काळ मधमाशा त्यांच्याभोवती घाेंगावत होत्या. यावेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या तब्बल दोनशेपेक्षाही अधिक वाहनधारकांची दोन्ही बाजूने गर्दी झाली होती.
ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर पोलिस आणि प्रशासनाने नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाची गाडी बोलावली. घटनास्थळी दाखल झालेल्या वाहनातून खाली पडलेल्या देवळे यांच्यावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले. तरीही मधमाशांनी त्यांना सोडले नाही. उलट अग्निशमन गाडीच्या दिशेने मोर्चा वळवला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही दंश केले. जिवाच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी गाडीच्या केबीनचा सहारा घेतला. काही वेळानंतर जखमीला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मदतीचा हात द्या...
रुग्णालयात आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे उपस्थित होते. शेतकरी म्हणून त्यांना शासकीय योजनेतून मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करा, असे फुंडकर यांनी यावेळी सांगितले.