भीमा कोरेगाव घटना : बुलडाण्यातील खामगावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 12:59 IST2018-01-03T10:43:53+5:302018-01-03T12:59:10+5:30
कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला खामगाव येथे बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भीमा कोरेगाव घटना : बुलडाण्यातील खामगावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
खामगाव (बुलडाणा) - कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला खामगाव येथे बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 10 वाजता शहरातून शांती मार्च काढण्यात आला असून शहरातील शाळा-महाविद्यालयांसोबतच खासगी प्रवासी वाहतूक धारक बंदमध्ये सहभागी झाले आहेत. एसटीसोबतच खासगी प्रवासी वाहतूकही बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर एका बसची तोडफोड करण्यात आल्यानंतर सामाजिक संघटनांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली.
या पार्श्वभूमीवर बुधवारी पहाटेपासूनच अत्यावश्यक सेवांसोबतच शहरातील शाळा महाविद्यालय, खासगी प्रतिष्ठाने संपूर्णपणे बंद आहे. स्कूल बस संचालकांनीही स्कूल बसेस बंद ठेवल्या तर मंगळवारीरात्रीपासूनच एसटी बसेस बंद असल्याने बस स्थानकावर शांतता आहे. बुधवारी पहाटेपासूनच खामगाव शहरातील पेट्रोलपंपही बंद होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?
पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.