चिखली तालुक्यातील बेराळा बनले कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:59+5:302021-07-07T04:42:59+5:30
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आल्याने अनेक ठिकाणी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली होताना दिसून येत ...

चिखली तालुक्यातील बेराळा बनले कोरोनाचा हॉटस्पॉट
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आल्याने अनेक ठिकाणी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. या बेजबाबदारपणाचा फटका तालुक्यातील बेराळा या गावाला बसला आहे. अवघ्या १५०० लोकसंख्येच्या या गावात केवळ तीनच दिवसांत ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी प्राप्त १५ अहवालांपैकी १३ रुग्ण बेराळा या गावाचे असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही ४२ असून यातील ३१ बेराळा गावातील आहेत. सध्याच्या संचारबंदीलाही शहरात फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. पालिकेचे वाहन माघारी फिरताच दुकाने पुन्हा उघडली जात असल्याने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे.
प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
बेराळा गावात अचानकपणे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने तालुका आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या गावातील कोरोनाबाधितांना आधार कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून गावात तीन दिवसांपासून तपासणी शिबिर घेऊन गावातील लहानांपासून मोठ्या व्यक्तीची कोरोना चाचणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. गावात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत कंटेनमेंट अॅक्टिव्हिटी राबवून गावातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी इम्रान शेख यांनी दिली आहे.
ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा
गावात अचानकपणे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व रुग्ण रोखण्यासाठी योग्य पद्धतीने काम करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे.