कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:37 IST2021-03-23T04:37:01+5:302021-03-23T04:37:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गेल्यावर्षी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ५९६ शेतकऱ्यांना १,१२१ कोटी ...

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्यावर्षी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ५९६ शेतकऱ्यांना १,१२१ कोटी ४० लाख रुपयांची पीककर्ज माफी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर बँकांनीही जिल्ह्यात २०१६नंतरचे विक्रमी पीककर्ज वाटप केले आहे. परिणामी कोरोना संकटाच्या काळात जेथे सर्व अर्थकारण ठप्प झाले होते, तेथे कृषी क्षेत्राने जिल्ह्याच्या अर्थकारणाला चांगला हातभार लावल्याचे आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्यावर्षी २ लाख १९ हजार ७८२ शेतकऱ्यांना २ हजार ७३३ कोटी ७२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे वार्षिक पतआराखड्यांतर्गत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी खरीप व रब्बी मिळून जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ७४१ शेतकऱ्यांना बँकांनी १ हजार ४८४ कोटी १७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. एकूण उद्दिष्टाच्या ते ५४ टक्के होते. परिणामी २०१७नंतरचे हे विक्रमी पीककर्ज वाटप म्हणावे लागले.
यामध्ये खरीप हंगामात २ हजार ४६० कोटी ३५ लाख रुपये पीककर्ज १ लाख ७९ हजार ४७१ शेतकऱ्यांना वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ५३ हजार ९५५ शेतकऱ्यांना बँकांनी १ हजार २६० कोटी ५४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. रब्बी हंगामात ४० हजार ३११ शेतकऱ्यांना २७३ कोटी ३७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले गेले होते. त्यापैकी २६ हजार ७८६ शेतकऱ्यांना बँकांनी २२३ कोटी ६३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. रब्बीच्या एकूण उद्दिष्टाच्या ८२ टक्के वाटप यंदा झालेले आहे. जिल्ह्याचा एकंदरीत विचार करता, २०१५-१६ या आर्थिक वर्षानंतर प्रथमच पात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा उच्चांक करण्यात आला आहे. ही औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागले.
--सहा वर्षांत वाटप झालेले पीककर्ज--
वर्षे कर्जवाटप (टक्केवारी)
२०१५-१६ ८७.१० टक्के
२०१६-१७ ७९.३९ २०१७-१८ २६.१३ २०१८-१९ ३१.७९ २०१९-२० २६.७९ २०२०-२१ ५४.०० टक्के
--कर्जमुक्तीचा लाभ मिळालेले शेतकरी--
जिल्ह्यात १,६९,५९६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. ११२१.२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती आतापर्यंत या शेतकऱ्यांना मिळाली. २५ हजार शेतकरी अद्यापही कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तर ५,३०० शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणिकरण रखडले आहे.