तार कुंपणात अडकलेल्या बिबट्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:03 IST2020-02-06T13:26:26+5:302020-02-06T14:03:23+5:30
बिबट्या जाळीत अडकल्याची माहिती शहरात वा-यासारखी पसरली.

तार कुंपणात अडकलेल्या बिबट्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
लोणार (बुलडाणा): लोणार ते किन्ही रोडलगतच्या एका शेताच्या तार कुंपणामध्ये बिबट्या अडकल्याची घटना गुरूवारी सकाळी आठ वाजता समोर आली. तेंव्हापासून वनविभागाच्या टिमकडून बिबट्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी १२.३० वाजेपर्यंत बिबट्या अडकलेलाच होता.
जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवराच्या काठावरून किन्ही रोड जातो. या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या दत्ता खरात आणि बादशहा खान यांच्या शेतामध्ये पाईप जोडत असताना लोखंडी जाळीच्या कुंपणामध्ये पाय अडकलेल्या स्थितीत बिबट्या दिसून आला. यामुळे शेतमजूराने लगेच पोलीस प्रशासन व वन अधिका-यांना याची माहिती दिली.
बिबट्या जाळीत अडकल्याची माहिती शहरात वा-यासारखी पसरली. त्यामुळे बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. शहरासह परिसरातील गावांमधूनही नागरिक घटनास्थळी जमले होते. लोणार पोलिसांनी या गर्दीला बाजूला करत वन विभागाला सहकार्य केले. लोणार वन विभागाची टिम काही वेळात त्या ठिकाणी पोहचली. परंतू बिबट्याला घाडण्यात यश आले नाही. दरम्यान, बुलडाणा येथून वन विभागाची टीम १२ वाजता पोहोचली. चार तासांपासून बिबट्याला काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.