बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात वाढत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही माेठी असल्याने जिल्ह्यातील काेविड सेंटर हाउसफुल्ल झाले आहे. त्यामुळे अकाेला जिल्हा परिषदेने ५० खाटांचे ऑक्सिजनची सुविधा असलेले काेविड सेंटर सुरू केले आहे. बुलडाण्यातही काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेउन काेविड सेंटर सुरू करण्याची गरज आहे.
जानेवारी महिन्यापासून बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्च महिन्यात काेराेनाने कहर केला असून, रुग्णसंख्येबराेबरच मृत्यूही वाढत आहे. उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याने जिल्ह्यातील सरकारी काेविड सेंटरबराेबरच खासगी काेविड सेंटरही हाउसफुल्ल झाले आहेत. पैसे माेजूनही अनेकांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. अकाेला शहरातही हीच स्थिती हाेती. तेथील जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन ५० खाटांचे काेविड सेंटर उभारले आहे. हे काेविड सेंटर कार्यान्वितही झाले आहे. अकाेला जिल्हा परिषदेने घेतलेल्या पुढाकाराचा आदर्श घेऊन बुलडाणा जिल्हा परिषदेनेही काेविड सेंटर सुरू करण्याची गरज आहे.
स्वतंत्र आराेग्य विभाग
जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र आराेग्य विभाग आहे. तसेच डाॅक्टरांसह परिचारिका व इतर कर्मचारीही उपलब्ध आहेत. तसेच जिल्हाभरात इमारतीची संख्याही माेठी आहे. उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा विचार केल्यास जिल्हा परिषद गावपातळीवर किंवा तालुकापातळीवर एक काेविड सेंटर सुरू करू शकते. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने त्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
सर्वांची विचार विनिमय करून निर्णय घेऊ
जिल्हा परिषदेच्या वतीने काेविड सेंटर उभारण्याविषयी काॅंग्रेसचे नेते देवानंद पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही संकल्पना चांगली असल्याचे सांगितले. तसेच याविषयी आराेग्य विभाग व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेता येइल, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या बहुतांश इमारती काेविड सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत. जशी जशी गरज पडेल तसे तसे सेंटर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्वतंत्र काेविड सेंटर सुरू करण्याची गरज पडली, तर त्याविषयी विचार निर्णय घेऊ.
भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. बुलडाणा