अखेर तीन दिवसानंतर खामगाव शहराचा पाणी पुरवठा सुरळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:13 IST2019-01-28T16:13:23+5:302019-01-28T16:13:51+5:30
खामगाव : स्थानिक पाणी पुरवठा योजनेच्या नादुरूस्त पंपाची दुरूस्ती रविवारी पुर्णत्वा आली. त्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.

अखेर तीन दिवसानंतर खामगाव शहराचा पाणी पुरवठा सुरळीत!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक पाणी पुरवठा योजनेच्या नादुरूस्त पंपाची दुरूस्ती रविवारी पुर्णत्वा आली. त्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. पंप नादुरस्त झाल्यानंतर शुक्रवारपासून खामगाव शहराचा पाणी पुरवठा ठप्प होता. हे येथे उल्लेखनिय!
शुक्रवारी दुपारी शहराच्या वामननगर, यशोधरा नगर, रेणुका नगर, बोबडे कॉलनी परिसरात पाण्याचे वितरण सुरू असताना, बुस्टर पंपावरील ८५ एचपीेचा बुस्टर पंप नादुरूस्त झाला. परिणामी, खामगाव शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यानंतर चिखली येथून एक सबमर्शीबल पंप आणण्यात आला. रविवारी हा पंप बसवून दुरूस्तीचे काम पूर्णत्वास आल्यानंतर सोमवारी पाण्याचे वितरण करण्यात आले.
वामननगरातील स्टॅन्डबाय पंप गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी तात्कळत रहावे लागले. तर काही भागातील नागरिकांना खासगी टँकर धारकांकडून पाणी विकत घ्यावे लागले. दरम्यान, आता पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर वामन नगर, तिरूपती नगर, यशोधरा नगर भागात तब्बल १३ तर काही ठिकाणी १५ दिवशी पाणी मिळाले.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक वेठीस!
आॅगस्ट महिन्यात जळालेला स्टॅन्डबाय पंप तात्काळ दुरूस्त होणे गरजेचे होते. मात्र, कार्यान्वित पंप नादुरूस्त होईपर्यंत स्टॅन्डबाय पंप बुस्टर पंपावर आणण्यात आला नाही. चालढकल वृत्तीने नादुरूस्त पंपाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तात्कळत बसावे लागले. तर काही नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
सोमवारी सुरळीत झाला पाणी पुरवठा!
बुस्टर पंपावरील नादुरूस्त पंप शनिवारी कार्यान्वित होवून पाणी पुरवठा सुरूळीत केल्या जाणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या उपविभागीय अधिकारी विद्या कानडे आणि नगर पालिकेच्या पाणी पुरवठा अभियंता प्राजक्ता पांडे यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी म्हणजेच सोमवारी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला.