७५ मीटर लांब तिरंगा, ४ हजार विद्यार्थी, देशभक्तीची गाणी; ओक्केमध्येच निघाली रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 13:19 IST2022-08-13T13:18:38+5:302022-08-13T13:19:47+5:30
चार हजारावर विद्यार्थ्यांचा सहभाग: गो.से. महाविद्यालयाचा उपक्रम

७५ मीटर लांब तिरंगा, ४ हजार विद्यार्थी, देशभक्तीची गाणी; ओक्केमध्येच निघाली रॅली
अनिल गवई
बुलडाणा/खामगाव: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी खामगावात ७५ मीटर लांब ऐतिहासिक तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला स्थानिक गो.से. महाविद्यालयातून जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी हिरवी झेंडी दिली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या रॅलीचा समारोप झाला.
स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या योगदान व बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. खामगाव येथील विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगावचा अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गो.से. महाविद्यालयाच्या वतीने ७५ मीटर लांब आणि १.८२ मीटर रुंद असा तिरंगा ध्वज तयार करण्यात आला आहे. तिरंगा ध्वज सन्मानाने खांद्यावर घेऊन खामगांव शहरांतून तिरंगा यात्रा निघाली. यावेळी आ. आकाश फुंडकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अतुल पाटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, अशोक झुनझुनवाला, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, बँक आॅफ महाराष्ट्रचे प्रबंधक दिनकरवेल एम.आर, नायब तहसीलदार विजय पाटील, साहित्यिक मुक्तेश्वर कुळकर्णी, विनोद डिडवाणीया, पत्रकार राजेश राजोरे, किशोर भोसले, प्रशांत देशमुख, अमोल गावंडे, ठाणेदार प्रदीप त्रिभुवन, अरूण परदेशी, सुरेश नाईकनवरे, दामोदर पांडे, डॉ. प्रशांत बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोबडे होते. या रॅलीत महाविद्यालयातील चार हजारावर विद्यार्थी सहभागी झाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी केले. संचालन प्रा. संगिता वायचाळ, पृथ्वीराज ठाकूर यांनी केले. आभार संयोजक हनुमंत भोसले यांनी मानले.
चौकाचौकात रॅलीचे स्वागत...
गो.से. महाविद्यालयापासून सुरू झालेली ही रॅली जलंब रोड, शासकीय तंत्र निकेतन, जलंब नाका, अंजुमन हायस्कूल, न्यायालय परिसर, टॉवर चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पोहोचली. या ठिकाणी ऐतिहासिक तिरंगा रॅलीचा समारोप झाला.
देशभक्ती गीतांचा गजर
- शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली मार्गस्थ होत असताना ठराविक अंतरावर ध्वनीफितीच्या माध्यमातून देशभक्ती गीतांचा गजर करण्यात आला. या ऐतिहासिक रॅलीमुळे खामगावात शनिवारी देशभक्तीच्या वातावरणाची निर्मिती झाली. रॅलीचे गुरूद्वारा सिंघ सभा, जेसीआय, धानुका परिवार तसेच सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात आले