२३०० वर्षांच्या पुरातन स्तूपाचे होणार जतन, ९९.७५ हेक्टर जमिनीला संरक्षक भिंत बांधणार
By सदानंद सिरसाट | Updated: January 20, 2025 08:21 IST2025-01-20T08:19:11+5:302025-01-20T08:21:37+5:30
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात आढळलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा २३०० वर्षे जुना इतिहास सांगणारा ऐतिहासिक ठेवा बुद्ध स्तुपाचे जतन होणार आहे. शासनाने भोन येथील स्तूप ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केल्याची अधिसूचना ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली.

२३०० वर्षांच्या पुरातन स्तूपाचे होणार जतन, ९९.७५ हेक्टर जमिनीला संरक्षक भिंत बांधणार
- सदानंद सिरसाट
खामगाव (जि. बुलढाणा) - बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात आढळलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा २३०० वर्षे जुना इतिहास सांगणारा ऐतिहासिक ठेवा बुद्ध स्तुपाचे जतन होणार आहे. शासनाने भोन येथील स्तूप ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केल्याची अधिसूचना ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली. त्यावर ६० दिवसांत हरकती मागविल्या. ती मुदत संपुष्टात आल्याने या स्थळाच्या जतनासाठीच्या उपाययोजनांना आता वेग येणार आहे.
पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात संग्रामपूर तालुक्यातील भोन गाव आहे. तेथे तब्बल ९९.७५ हेक्टर जमिनीला संरक्षक भिंत बांधून बुद्ध स्तूपाचे जतन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. त्यासाठी १ ऑक्टोबर २०२१ रोजी जलसंपदा विभागाने नाशिक पुरातत्त्व विभागाची तत्त्वतः मान्यता मिळविली. धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या मधोमध जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्राची निर्मिती होणार आहे. स्मारकाच्या सर्वच बाजू पाण्याने वेढलेल्या राहणार आहेत.
उत्खननात काय आढळले ?
गावात २००२ पासून पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात प्राथमिक टप्प्यात ५ वर्षे उत्खनन झाले.
त्यामध्ये सम्राट अशोककालीन बुद्ध स्तूप आढळले. या स्तूपाचा पूर्ण रूपातील प्रदक्षिणा मार्ग सापडला.
त्या काळातील परंपरेच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे आढळून आले.
त्यात तत्कालीन अनेक विहिरी, नाणी, मृण्मयी अलंकार अशा विविध वस्तू सापडल्या आहेत.