भीषण अपघात! बुलडाण्यात टिप्पर उलटून १६ मजूर गंभीर जखमी; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 14:00 IST2021-08-20T13:57:04+5:302021-08-20T14:00:39+5:30
सिंदखेड राजा-मेहकर मागार्वरील तडेगाव फाट्याजवळची घटना; सर्व मजूर मध्यप्रदेश, बिहारमधील

भीषण अपघात! बुलडाण्यात टिप्पर उलटून १६ मजूर गंभीर जखमी; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
दुसरबीड (जि. बुलडाणा): सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर दुसरबीड गावानजीक तडेगाव फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुराला तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या टिप्परला अपघात होऊन त्यात बसलले १६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. यातील जवळपास ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गंभीर जखमींना त्वरेने जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात २० ऑगस्ट रोजी दुपारी १२च्या सुमारास घडला.
प्राथमिक माहितीनुसार दुसरबीड येथून लोखंडी गज घेऊन एक टिप्पर हे समुद्धी महामार्गच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तडेगाव येथील कॅम्पमध्ये जात होता. या टिप्परमध्ये समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूरही बसलेले हाेते. तडेगाव नजीक अचानक टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात उलटला. त्यामध्ये असलेले मजूर गंभीर जखमी झाले असून यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र त्यास किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. अपघातातील गंभीर जखमींना त्वरित जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यातील तीन जखमींना सिंदखेड राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातातील मृतांचा नेमका आकडा किती ही बाब अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नसल्याचे किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार म्हणाले. अपघातामधील गंभीर जखमी मजूर व मृतक हे मध्यप्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळातच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना त्वरित जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातानंतर तडेगाव नजीक बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. सोबतच या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.