Vidhan sabha 2019: Shiv Sena-BJP's old faces reappear in first list | Vidhan sabha 2019 : पहिल्या यादीत शिवसेना-भाजपची जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी
Vidhan sabha 2019 : पहिल्या यादीत शिवसेना-भाजपची जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी

- नारायण जाधव
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांमध्ये शिवसेना, भाजपच्या वाट्याला नऊ-नऊ मतदारसंघ आले आहेत. पहिल्या यादीत कल्याण पश्चिममधील विद्यमान आ. नरेंद्र पवार यांचा पत्ता कापून हा मतदारसंघ भाजपने शिवसेनेच्या पारड्यात टाकला आहे. हा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे शहापूरमधून शिवसेनेने पांडुरंग बरोरा तर ऐरोलीमधून भाजपने संदीप नाईक या राष्ट्रवादीतून पक्षांतर करून आलेल्या आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. मात्र, पक्षांतर करून आलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील दिग्गज नेते गणेश नाईक यांच्याऐवजी बेलापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच भाजपने पसंती देऊन नाईक यांना ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’वर ठेवले आहे.
पार्टी विथ डिफरन्स, अशी ओळख सांगणाºया भाजपने भार्इंदरमधून मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेल्या नरेंद्र मेहतांनाच मैदानात उतरवले आहे तर ठाण्यातील शिवसैनिकांनी मागणी करूनही ठाणे शहर मतदारसंघ शिवसेना श्रेष्ठींनी भाजपलाच सोडला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान आ. संजय केळकर यांचा जीव भांड्यात पडला आहे.
ऐरोलीच्या बदल्यात शिवसेनेने नरेंद्र पवार यांचा कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपकडून काढून घेतल्याची चर्चा आहे. मुंब्रा-कळवा, उल्हासनगर येथील उमेदवारीबाबत मात्र अद्यापही अनिश्चितता आहे. येथून दोन्ही पक्षांनी अद्याप कुणालाही उमेदवारी दिलेली नाही. तिकीटवाटपावरून युतीतील दोन्ही पक्षांत तणातणी कायम आहे. ठाणे शहर मतदारसंघ भाजपलाच सोडल्याने ठाण्यातील तर बेलापूर आणि ऐरोली हे नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडल्याने तेथील शिवसैनिकांत तीव्र नाराजी आहे. तिकडे कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर यांच्यासह रमेश म्हात्रे अशा दोघांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेनेतील पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आता भोईर यांना मुंब्रा-कळवा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याकरिता आग्रह केला जात असला तरी मंगळवारी कल्याण ग्रामीणमधून अर्ज भरून त्यांनी मुंब्रा-कळव्यातून लढण्यास नकार दिला. मात्र, कल्याण पश्चिम मतदारसंघातून लढण्यास ते तयार असल्याचे समजते. कल्याण पूर्वमधून भाजपत आलेल्या अपक्ष आ. गणपत गायकवाड यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे यांनी शिवसेनेकडून मंगळवारी अर्ज दाखल केला.

वंचित, मनसेचे उमेदवार जाहीर

वंचित बहुजन आघाडीने कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उन्मेश बागवे तर मुंब्य्रातून अनिल भगत यांना आणि एमआयएमने बरक्तुला एली हसन शेख यांना उमेदवारी दिली आहे. मनसेकडून ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील, कल्याण पश्चिमेतून प्रकाश भोईर आणि बेलापूरमधून गजानन काळे यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी मुरबाड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून प्रमोद हिंदुराव यांनी अर्ज भरला.


Web Title: Vidhan sabha 2019: Shiv Sena-BJP's old faces reappear in first list
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.