निळियेची पिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:49 IST2018-07-21T23:49:30+5:302018-07-21T23:49:57+5:30

नामाच्या गर्जनेत पावले निळ्यासावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने चालत असतात. डोळ्यांना त्याच्या दर्शनाचे वेध लागतात.

Nilai pishi | निळियेची पिशी

निळियेची पिशी

- उमेश वैद्य

आषाढात आकाशात मेघांची दाटी होते. गर्जना ऐकू येतात आणि पंढरीच्या वाटेवर प्रेमिकांची दाटी होते. नामाच्या गर्जनेत पावले निळ्यासावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने चालत असतात. डोळ्यांना त्याच्या दर्शनाचे वेध लागतात. त्याच्या आलिंगनासाठी बाहू स्फुरण पावतात. त्याचे अभंग गातगात त्याच्यातच एकरूप होण्यासाठी वेडे झालेल्या प्रेमीजनांच्या मनात त्या सावळ्याशी कायमच्या एकरूपतेचे स्वप्न तरळत असते. त्याचेच प्रतीक म्हणजे वारी...

हित्यातले सर्वच म्हणजे, शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत रस संतकाव्यामध्ये आलेले आहेत. यापैकी शृंगार, करुण व शांत हे रस प्राधान्याने आढळतात. संतकाव्याचे, रचनाबंधांच्या दृष्टीने, ओवी, दिंडी, साकी, कटिबंध असे अनेक प्रकार असले, तरी निरूपणात्मक काव्यासाठी ओवी आणि स्फूट भावकाव्यासाठी अभंगाचाच वापर संतकाव्यात सर्वसाधारणपणे झालेला आढळतो. अभंग तालगेय तर ओवी स्वरगेय. या अभंगामधलाच एक प्रकार म्हणजे विरहिणी किंवा विराणी.
ज्ञानेश्वरांच्या अनेक विराण्या लताबार्इंच्या प्रासादिक आवाजात कानांवर पडतात, तरी विरहिणी म्हणजे नेमकं काय? संतांच्या इतर काव्यापेक्षा विराण्यांमध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे त्या काव्याला विराणी असं म्हणायचं? ज्ञानेश्वरांव्यतिरिक्त आणखी कुणाच्या विराण्या आहेत का? साहजिकच, असे अनेक प्रश्न मनात येतात. ज्ञानेश्वरांच्या विराण्या म्हणजे अर्थ-रसाचं भांडार. वेगवेगळ्या रसांची लयलूट आहे.
अभंगाचेही पाळणा, अंबुला, डौर, हमामा, फुगडी, पांगुळ, कूट्, कापडी, गवळण असे अनेक उपप्रकार आहेत. या सर्व प्रकारांमध्ये अभंगाचा विरह व शृंगारात्मक आविष्कार म्हणजे विरहिणी किंवा विराणी. विराणीमध्ये प्रमुख रस असतो, तो म्हणजे विरहरस. त्याच्या जोडीला शृंगाररसही येतो. विठ्ठलाला, आपल्या उपास्य दैवताला किंवा आत्मस्वरूपाला आपला प्रियकर आणि स्वत:ला प्रेयसी कल्पून विरहावस्थेच्या विव्हल भावावेशात उत्स्फूर्त स्फुरलेले काव्य म्हणजे विराणी.
विरहरसाच्या छटा दाखवाव्यात, विरहिणीचे स्त्री विभ्रम रेखाटावेत, ते ज्ञानियांच्या राजानेच. अनेक संतांनी विराण्या लिहिलेल्या असल्या, तरी ‘विराणी’ हा अभंगाच्या प्रकारामध्ये ज्ञानेश्वरांच्या रचनांना तोड नाही. ‘ज्ञानियांचा राजा’ असं त्यांचं यथार्थ वर्णन असलं, तरी त्यांना ‘विरहिणींचा राजा’ असंही म्हणावंसं वाटतं, इतक्या रसपूर्ण विराण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत.
एका रचनेमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, ‘इतके वेड या कृष्णाचे लागले की, त्या निळ्यासारखी मी सुद्धा वेडी झाले.’ इथे ते कृष्णाला वेडा म्हणताहेत. जो वेड लावतो तो वेडा. वेड्याचे वेड लागून मीसुद्धा वेडी झाल्ये. हे म्हणजे, एखाद्या प्रेमिकेने प्रियकराला ‘पगला कही का’ असं म्हणावं आणि त्याच्या प्रेमात स्वत: पागल व्हावं, असंच आहे.
निळियेच्या निशी विरहिणी पिशी।
शेजबाजे कैशी आरळ शेजे॥१॥
कृष्णासंगे वाली विव्हळ जाली निळी।
चंदन अंगी पोळी विरहज्वरे ॥ २॥
ज्ञानदेव प्रेम निळारूप रूपसे सोहळा।
कृष्णवेधे वेधली वो लाभली वसे॥ ३ ॥
कृष्ण निळा तर त्याची प्रेमिका विरहिणी ‘निळी’. प्रियकराबद्दल इतके प्रेम, उफाळून आलं की, ही निळी त्याच्यात विव्हल झालीये. विरहाचा ज्वर इतका चढला की, एरव्ही शरीराला थंडावा देणारं चंदन तेसुद्धा पोळतंय, चंदनाचासुद्धा चटका बसतोय. कृष्णावर प्रेम करणे हे त्याच्या रूपाइतकेच लोभसवाणे, देखणे आहे. हा प्रेमाचा सोहळा अतिशय सुरेख आहे. त्याच्याकडे आकर्षली गेलेली विरहिणी’ त्याच्या विरहाच्या तापाने जणू ओसाड झाली आहे.
‘विरहिणी स्त्रीची हकिकत’ या स्वरूपात लिहिलेल्या ज्ञानेश्वरांच्या काही विरहिण्या आहेत. त्यापैकी एका विराणीमध्ये ते म्हणतात,
कृष्णे वेधली विरहिणी बोले। चंद्रमा करितो उबारा गे माये।
न लवा चंदनु न घाला विंजणवारा। हरिविणे शून्य शेजारू गे माये॥१॥
माझे जिवींचे तुम्ही कां वो नेणा। माझा बळिया तो पंढरीराणा वो माये॥२॥
नंदनंदनु घडी घडी आणा। तयाविण न वचित प्राण वो माये॥३॥
रखुमादेवीवरू विठ्ठलु गोविंदु। अमृतपान गे माये॥४॥
इथे कृष्णाने तिला आपल्याकडे आकर्षून घेतले आहे. प्रेमाने आकर्षित झालेली ती विरहिणी आपली हकिकत दुसऱ्या स्त्रीला सांगते आहे. चंद्र हे शीतलतेचं प्रतीक. विरहज्वर एवढा अनावर आहे की, चंद्राची शीतलतासुद्धा चक्क उष्ण वाटते आहे. चंदन लावून मिळणारी
शीतलतासुद्धा नको झालीये. मऊमऊ रेशमाच्या दशा असलेले विंझण म्हणजे एक प्रकारचा पंखा. तोसुद्धा नको वाटतो. हरिशिवाय तिला चैनच नाही. बिछान्यावर पडणंसुद्धा नको वाटतंय.
विराणी म्हणजे प्रामुख्याने मधुराभक्तीचे काव्य. मधुराभक्तीमध्ये भक्त आपल्या उपास्याला प्रेमास्पद कल्पून त्याच्यावर प्रेम करतो. इथं लिंगभाव महत्त्वाचा आहे. पुरुष भक्ताचे उपास्य जर पुरुष असेल, तर तो स्वत: स्त्रीभावाने आपल्या उपास्यावर भक्ती करतो, हीच मधुराभक्ती होय.
ज्ञानेश्वरांच्या अशा काही विराण्या आहेत की, ज्यामध्ये स्त्रियांच्या शृंगाराचं यथासांग वर्णन येतं. शृंगाराची साधने आणि इत्यादी बारीकसारीक तपशील येतात, तत्कालीन शृंगाराच्या प्रसाधनांचे उल्लेख येतात. शुभाशुभाचे संकेत येतात. प्रारंभी शृंगाररसाची उधळण करत सुरू झालेली विराणी शेवटी जीव-शिव-ऐक्याच्या पारमार्थिक तत्त्वज्ञानापर्यंत येऊन पोहोचते. वरवर पाहता हे सेतूबंधन एका टोकापासून दुसºया टोकाचे वाटते खरे! परंतु, खोलवर विचार केला तर शेवटच्या मिलनासाठीच हा सगळा सायास आहे, असे स्पष्टपणे जाणवते. जसजशी ही विराणी पुढे जाते, तसतसा शृंगाररस, भक्ती आणि ऐक्यभावात परिवर्तित होण्याची किमया विलक्षण साधलेली दिसते.
प्रेम, विरह, शृंगार, कौतुक, प्रेमयुक्त तक्रार अशा अनेकानेक छटा ज्ञानेश्वर अत्यंत बारकाईने आणि कौशल्याने दाखवतात की, ती विरहिणी स्त्री सजीव होऊन आपल्यासमोर वावरत असल्याचा भास होतो, इतकं सजीवत्व त्यात दिसतं. प्रियकर विठ्ठलाच्या भेटीसाठी उतावीळ झालेली विरहिणी त्याची भेट झाल्यावर त्याच्यातच एकरूप होते, दुजाभाव नाहीसा होतो. ‘चित्त चैतन्या पडता मिठी, अवघी होय हरीमय सृष्टी’ अशी अवस्था!
विरहिणीचं मन ‘त्याच्या भेटीसाठी जेव्हाजेव्हा जातं, तेव्हातेव्हा आत्यंतिक सुखाने त्याच्यातच विरघळून जातं, एकरूप होतं. त्यामुळे त्याची भेट होऊनही त्या निळियाबद्दल विरहिणीला काही बोलताच येत नाही. त्याचं रूप शब्दानं सांगता येत नाही. सांगण्यासाठी त्याच्यात आणि तिच्यात दुजाभाव तरी कुठे उरतो? एका विराणीत हे एकत्व मांडताना ज्ञानेश्वर म्हणतात,
भेटीचे नि सुखें मनचि होय मुर्के।
ते रूप देखें परि बोलावेना
सगुण गुणाचा म्हणोनि घातली मिठी।
तव तो आपणया समसाठी करु नि ठेलें
विरहिणीची इतिकर्तव्यता म्हणजे आपल्या उपास्याची भेट, विठ्ठलात समर्पण, जीवाशिवाची भेट. ही एकदा झाल्यावर निळी आणि निळिया वेगळा कुठे उरतो? अनेक जन्मांच्या विरहाची समाप्ती मिलनात होते. असे मिलन हेच मनुष्यजन्माचे इतिकर्तव्य. अशा मिलनासाठीच तो ‘निळिया’ विटेवर उभा राहून विरहिणींना साद घालतो आहे. अधीरपणे कटीवर हात ठेवून वाट पाहतो आहे. विठ्ठलात ऐक्याचा हा प्रवास म्हणजेच वारी. दरवर्षी वारीला जाताना कायमचं त्याच्यात ऐक्य पावायचं स्वप्न उराशी घेऊनच दिंड्या निघतात. त्या ‘निळियाच्या’ नामघोषात त्याच्यातच ऐक्य पावण्यासाठी पावले त्याच्या दिशेने निघतात.

Web Title: Nilai pishi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.