Navratri 2020: I-Durga: | Navratri 2020 : मी- दुर्गा : वनीता कदम, कुटुंबाबरोबर समाजसेवा

Navratri 2020 : मी- दुर्गा : वनीता कदम, कुटुंबाबरोबर समाजसेवा

ठळक मुद्दे Navratri 2020 : मी- दुर्गा : वनीता कदमआशा स्वयंसेविकांची कोरोना योद्धा म्हणून कुटुंबाबरोबर समाजसेवा

नितीन काळेल

कोरोनामुळे आशा स्वयंसेविकांवर मोठी जबाबदारी आहे. तसेच त्यांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. अशाचप्रकारे कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील वनिता कदम यांना काम करताना आजारपण आले. तरीही न डगमगता त्यांनी पुन्हा सेवावृत सुरूच ठेवले. स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेतानाच कोरोना रोखण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण जबाबादारी पार पाडत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निमार्ण झाल्यापासून आरोग्य विभागावर मोठी जबाबदारी आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आशा स्वयंसेविकाही आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत. गावोगावी असणाऱ्या या स्वयंसेविका सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करतात. त्यासाठी त्यांना दररोज ठराविक घरांना भेट द्यावी लागते. घरची जबाबदारी सांभाळत त्यांना कोरोना योध्दयाचे काम पार पाडावे लागते. अशाच प्रकारे देऊर येथील वनिता कदम या आशा स्वयंसेविका अडचणींवर मात करत काम करत आहेत.

कोरानाचा प्रादुर्भावापासून त्यांचे काम सुरू आहे. कदम यांच्याकडे २१५ घरे तपासणी साठी आहेत. दररोज अनेक कुटुंबीयांना त्यांना भेट द्यावी लागते. संबंधित कुटुंबातील कोणाला रक्तदाब, मधुमेह आहे का ? कोणाची ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे का? हे पाहून तसा अहवाल द्यावा लागतो. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कदम यांच्याकडे असणाऱ्या विभागात जवळपास २५ हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली. या काळात त्यांची दोन लहान मुले सांगायची जाऊ नको म्हणून. पण, पती, सासू व माहेरच्या लोकांच्या पाठबळामुळे त्यांनी आपले सेवावृत कायम ठेवले.

उन्हाळ्यात तर घर भेटी देताना त्यांना उन्हाचा त्रास झाला. काही दिवस घरी थांबावे लागले. त्यानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. मनात कोरोनाची भीती असलीतरी कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी कधीच कुचराई केली नाही. स्वत:बरोबरच कुटुंब आणि समाजाचीही त्या तितकीच जबाबदारी घेत आहेत.

कोरोना योद्धा म्हणून त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. कोरोना हे जगावर ओढावलेले मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करण्याची जबाबदारी एकट्या शासनीची नव्हे तर आपलीही आहे. याच जाणिवेतून याही पुढे कार्य सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरांना भेटी द्याव्या लागतात. कोणी रुग्ण सापडला तर अधिक सतर्क रहावे लागते. माझ्याकडे जबाबदारी असणाऱ्या भागात काही रुग्ण सापडले. पण, अशाही स्थितीत काम करावे लागते. यासाठी माझे कुटुंब व माहेरच्या लोकांकडूनही खूप मोठे सहाकार्य मिळत आहे.

-वनीता कदम
आशा स्वयंसेविका,
देऊर, ता. कोरेगाव

Web Title: Navratri 2020: I-Durga:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.