जळमटे अंधश्रद्धेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:30 IST2020-06-22T16:29:33+5:302020-06-22T16:30:25+5:30
बोरदा गावात पोटफुगीवर उपचार म्हणून या आठ महिन्याच्या बालकाच्या पोटावर तप्त विळ्याचे चटके देण्यात आले.

जळमटे अंधश्रद्धेची
सविता हरकरे
नागपूर:
विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी माणसाचे विचार किंवा दृष्टिकोन मात्र अजूनही बदललेले नाहीत. देशातील एक मोठा समूह ज्यात प्रामुख्याने ग्रामीण आणि आदिवासी भागाचा समावेश होतो अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे. अंधश्रद्धेची जळमटे काही बाजूला सारली गेलेली नाहीत. अंधश्रद्धेने त्यांना एवढे पछाडलेय की वेळप्रसंगी स्वत:चा आणि इतरांचाही जीव ते धोक्यात घालत असतात.
तब्येतीसाठी हे लोक अजूनही डॉक्टरांकडे औषधोपचार घेण्यापेक्षा तांत्रिक-मांत्रिकाकडे जाणे पसंत करतात. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा त्यापैकीच एक. येथे वास्तव्याला असलेल्या आदिवासी बांधवांचा ‘भूमका’ वर प्रचंड विश्वास. मांत्रिकाला तेथे भूमका म्हणतात. एकवेळ लोक डॉक्टरांवर विश्वास ठेवणार नाही पण या भूमकाने सांगितलेली कुठलीही गोष्ट ते डोळे मिटून करतात. त्याचाच गैरफायदा घेऊन हे भूमका मग आदिवासींची फसवणूक करत असतात. वेगवेगळ्या भीती दाखवून त्यांनी येथील लोकांच्या मनात अक्षरश: दहशत निर्माण केली आहे.
ठल्याही रोगावर उपचारासाठी अत्यंत अघोरी प्रथा हे भूमका अवलंबत असतात. या अघोरी उपचारातून आजवर अनेकांचे जीव त्यांनी घेतले आहेत. पण लोकांच्या डोळ्यावरील अंधश्रद्धेचा पडदा मात्र हटायला तयार नाही. मेळघाटात अंधश्रद्धेतून उद्भवणाऱ्या अशाच एका अघोरी प्रथेला दोन बालके नुकतीच बळी पडली. त्यात एक आठ महिन्यांचा बालक तर दुसरी अवघ्या २६ दिवसांची बालिका आहे. येथील बोरदा गावात पोटफुगीवर उपचार म्हणून या आठ महिन्याच्या बालकाच्या पोटावर तप्त विळ्याचे चटके देण्यात आले. त्याच्या वडिलांनी त्याला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अथवा डॉक्टरांकडे न नेता गावातील भूमकाकडे नेले. हा प्रकार आरोग्य कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी त्वरित कार्यवाही करीत त्या बालकाला दवाखान्यात नेले. पोलिसांनी या भूमकाविरोधात तक्रार दाखल केली असली तरी मुलाचे आईवडील त्याचे नाव सांगण्यात तयार नाहीत. एवढी दहशत आहे.
याच भागातील चुरणी गावात २६ दिवसांच्या चिमुकलीला विळ्याने डागण्या देण्यात आल्या. पोलिसांनी तिच्या वडिलांनाही जादुटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अटक केली आहे. या दोन्ही प्रकरणात आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपली जबाबदारी पाड पाडतीलच. पण मूळ प्रश्न हा येथील लोकांच्या नसानसात भिनलेल्या अंधश्रद्धेचा आहे. ती समूळ नष्ट कशी आणि केव्हा होणार? महाराष्ट्रात २०१३ साली अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला. अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा यांचे समूळ उच्चाटन हा या कायद्यामागील मुख्य हेतू आहे. पण ते प्रभावी ठरत नसल्याचेच चित्र आहे. नरबळीसारखे नृशंस प्रकार अजूनही घडत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या कठोर कायद्यानंतरही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर झारखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये सुद्धा हे अघोरी प्रकार सुरु आहेत.
अशिक्षितता आणि जागरुकतेचा अभाव ही यामागील दोन महत्त्वाची कारणे आहेत. काही सामाजिक संस्थांकडून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जागरुकतेचे कार्य सुरू असले तरी शासनाने केवळ कायद्याचा बडगा न उगारता अशा भागात लोकजागर केला पाहिजे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर येथे सूर्यग्रहणाच्या दिवशी एक स्तुत्य उपक्रम राबवला. गर्भवतीने सूर्यग्रहण बघू नये, या काळात भाज्या चिरु नये, फळे कापू नये असले अनेक हास्यास्पद समज या भागातील लोकांनी करुन घेतले होते.
ही अंधश्रद्धा दूर करण्याकरिता समृद्धी जाधव नामक एका गर्भवतीने केवळ सूर्यग्रहणच बघितले नाहीतर ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळे-पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे, मांडी घालून बसणे यांसह विविध शारीरिक हालचाली करीत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला. लोकांच्या मानगुटीवर बसलेले अंधश्रद्धेचे भूत पळविण्याकरिता त्यांनी हे धाडस केले. लोकांसाठी ते निश्चितच प्रेरणादायी ठरेल. कारण शेवटी लोकांमधील जागरुकता आणि संघटित विरोधानेच या विळख्यातून समाजाची सुटका होऊ शकणार आहे.