माती माणसांच्या पडझडीची वेदनादायी कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:50 PM2017-10-01T12:50:38+5:302017-10-01T12:50:59+5:30

रसगंध : बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही...या कविता संग्रहांतून तर ‘पडझड वा-याच्या भिंती’ या ललित संग्रहातून आपली ग्रामीण ओळख निष्ठापूर्वक जपणारे कवी श्रीकांत देशमुख मराठी वाचकांना सुपरिचित आहेत.

Painful poem of soil menace | माती माणसांच्या पडझडीची वेदनादायी कविता

माती माणसांच्या पडझडीची वेदनादायी कविता

googlenewsNext

- डॉ. संजीवनी तडेगावकर

बळीवंत आम्ही ढेकळांचे दास, भुईचाच वास आंगोपांगी..असं म्हणत, आपलं कुणबीपण अंगाखांद्यावर मिरवत शेत-यांच्या शेतीनिष्ठ जीवन जाणिवांची मांडणी आस्थेवाईकपणे आपल्या कवितेतून करताना श्रीकांत देशमुख कमालीचे संवेदनशील होत जातात. त्यांच्या तीनही कविता संग्रहांतून ते प्रकर्षाने जाणवत राहते. कृषी जाणिवांचं हे संवेदन वाचताना बदलत गेलेल्या गावाची पडझड वाचकांना उद्ध्वस्त, अस्वस्थ गावात घेऊन जाते. 

आम्हा घरी तण अंधाराचे धन
डोळ्यातले पान सुकलेले....
माळोदात बाप ऐकतो पुराण
बुजलेले कान काळोखाने....

शेतक-यांच्या अनेक पिढ्या मातीत लोळून वाढल्या, मातीतूनच घडल्या आणि मातीवरच पोसल्या आहेत. मातीची उटी अंगाला लावून, मातीचा टिळा कपाळी लेवून, मातीसाठीच झगडल्या आहेत. भूमिपुत्र म्हणवून घेणारा इथला शेतकरी स्वत:ला राजा समजत असे. एकेकाळी  ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असं अर्थव्यवस्थेचं धोरण मानणा-या शेतक-यांची आजची स्थिती मात्र खूपच चिंतनीय आहे. आपल्या प्रामाणिकपणासाठी, देवभोळ्या श्रद्धेसाठी परिचित असणा-या शेतक-यांची होणारी अधोगती हा श्रीकांत देशमुखांच्या कवितेचा मुख्य गाभा आहे. त्यांनी गावशिवारात झालेले बदल किती नासधूस करणारे ठरले याचं सूक्ष्म निरीक्षण नोंदविले आहे. 

तुळस पारोशी राहिल्यावर हळहळणारी आई, तिन्ही सांजेला, घर-अंगणात दिवा लावून लक्ष्मीची वाट पाहणारी, सणवार रीतीभातीनं करता आले नाहीत म्हणून दुखावली जाणारी, घरादाराच्या, गणगोताच्या जीव-जित्राबाच्या समृद्धीसाठी सतत झिजणारी, मनातून प्रार्थना करणारी आई-बाई ओसरीवर बसून म्हाता-या डोळ्यांनी खिन्न उदास गावाचं चित्र पाहते, तेव्हा ती मुळातून हादरून खंतावत राहाते. काही केल्या गावाचं नवं रूप जुन्या माणसांच्या डोळ्यांना रुचत नाही. त्यामुळे नव्या-जुन्याची सांगड घालताना नाही म्हटलं तरी त्यांची तारांबळ उडते. न रुचलेल्या गोष्टी स्वीकारताना दिवसाढवळ्या अंधारून यावं, तशी अवस्था बापाच्या पिढीची होते. त्यामुळेच तर हे सर्व ‘बाप’ माणसं आजच्या पडझडीत कासावीस होतात. तेव्हा कवी म्हणतो....

‘गेला पाऊस निघून बाप एकलाच रडे
गेल्या दिवसाचे त्याच्या अंगावर ओरखडे’

शेतक-यांच्या जीवनात माती आणि पाऊस यापेक्षा श्रेष्ठ काहीच नसते; पण अलीकडे बेभरवशाच्या ऋतुंनी कृषिजनांच्या हिरव्या स्वप्नांची पार नासाडी करून टाकली आहे. जवळ येऊन हुलकावणी देत जाणारा पाऊस जाताना गावच्या तोंडचा घास घेऊन जातो, त्यांच्या हाती सावकारी पाशातली झाडफांदी देऊन...

‘भागीरथी काळेनं एंड्रीन पिऊन जीव दिला
कपाशीला नेमकीच बोंडं लागलेली
मारण्याऐवजी बोंडअळी
मारून घेतलं स्वत:लाच.’

अशा रीतीने मातीत राबणा-या जिवांचे जगणे मातीमोल होते. तेव्हा गावगढीचे, रानशिवाराचे दिवस भरत आलेत की काय? असं वाटल्यावाचून राहत नाही. जीव रानोमाळ पांगावा म्हणून श्वास मातीला देणा-या या जिवांवर अशी वेळ का आली असेल?  याचा शोध घेताना, जितका लहरी निसर्ग याला जबाबदार आहे, तितकीच किंबहुना त्याहून जास्त इथली शेतीसंदर्भातील ध्येयधोरणं आणि राजकीय भूमिका. इतका मोठा समाज शेतीवर अवलंबून असताना तिला स्थिरत्व देणारे निर्णय दुर्दैवाने कोणतेच सरकार घेऊ शकले नाही.

शेतक-यांच्या विनाशाला थोडा-थोडा का होईना सर्वांनीच हातभार लावला आहे. श्रीकांत देशमुखांच्या कवितेत विनाशाच्या टोकावर उभा असलेला... उद्ध्वस्त होऊ पाहणारा गाव त्याच्या ताणतणावासह उभा राहतो. ८०च्या दशकात शेतकºयांच्या जीवनाबद्दल भान ठेवून जबाबदारीनं लेखन करणा-यांपैकी श्रीकांत देशमुख हे महत्त्वाचे कवी असून ‘खळे दळे काठोकाठ, धनधान्याने भरावे, सूर्य माथ्यावर येता, रावे झाडीत घुमावे’ हा आशावाद मनात जपून आहेत.

(लेखिका जालना येथील प्रसिद्ध कवयित्री आहेत.)

Web Title: Painful poem of soil menace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.