दो हजार का सनलाईट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 07:42 PM2018-05-26T19:42:23+5:302018-05-26T19:43:37+5:30

लघुकथा : या नव्या सोसायटीत एक नवी जातवार उतरंड. स्वतंत्र बंगलोवाले उच्च जातीचे. थ्री बीएचके वाले ‘मध्यम’च पण स्वत:ला उच्च मानणारे आणि टू बीएचकेवाले साधारण. वन बीएचकेवाल्या ‘हलक्या’ लोकांना तर या वस्तीत प्रवेशच नाही. 

Sunlight of two thousand | दो हजार का सनलाईट 

दो हजार का सनलाईट 

googlenewsNext

- हंसराज जाधव 

मी गाडी पार्क  केली तसा वॉचमन जवळ आला
‘कोन चाहीए साहब?’
मामा, ते फ्लॅट पाहिजे भाड्यानं. तुमच्या सोसायटीत असल्याचं कळलं, म्हणून..’
‘हा, है ना साब, चार नंबर पे हैं एक टू बीएचके!’
‘वन बीएचके बघा ना ! टू बीएचके काय करायचंय आपल्याला..?’
‘नही साहब, यहॉ सब टू बीएचके, थ्री बीएचकेच हैं. कैसा हंै, वन बीएचके बोले तो कैसे भी लोग आके रहेंगे ना.. ये रिच सोसायटी हैं साहब!’
मी वॉचमनला बारकाईने न्याहाळले. ‘कैसे भी लोग’ म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नव्हते.
‘ठीक आहे बघून तर घेऊ’ या माझ्या वाक्याला  प्रतिसाद देत तो चावी आणायला गेला.
उभ्याउभ्याच मी सारा कँपस पाहून घेतला. सहा मजली अपार्टमेंट, त्याच्या बाजूलाच आठ बंगलोची वेगळी लाईन, त्यापुढे उभ्या महागड्या गाड्या. अपार्टमेंटच्या खाली दुचाकींची गर्दी, चारदोन चारचाकी. तेवढ्या गर्दीत फ्लँटधारकांच्या नावाची पाटी स्वत:चं अस्तित्व शोधत असलेली..
या नव्या सोसायटीत एक नवी जातवार उतरंड. स्वतंत्र बंगलोवाले उच्च जातीचे. थ्री बीएचके वाले ‘मध्यम’च पण स्वत:ला उच्च मानणारे आणि टू बीएचकेवाले साधारण. वन बीएचकेवाल्या ‘हलक्या’ लोकांना तर या वस्तीत प्रवेशच नाही. ते गावकुसाबाहेर. वॉचमेनच्या ‘कैसे भी लोग’ या वाक्याची पुन्हा आठवण झाली. सोसायटीत येणारे दूधवाले, भाजीवाले तसे त्यांच्या हिशोबी हलक्या जातीचेच! त्यांच्याकडून वस्तू चालतात घ्यायला, फक्त ते ‘शेजारी’ म्हणून चालत नाहीत, बस्स एवढंच!
 लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेल्यावर वॉचमनने बारा नंबरचा फ्लँट उघडला. आतल्या धुळीवरून तो बऱ्याच दिवसापासून बंद असल्याचं लक्षात आलं. वॉचमनने एकेक करून सगळ्या रूम दाखवायला सुरुवात केली. चौथ्या मजल्यावर असल्यामुळं हवा खेळती होती. प्रशस्त हॉल, किचन, चिल्ड्रन्स बेड हे सर्व पाहत आम्ही मास्टर बेडमध्ये पोहोचलो.
‘देखो साहब, बेडरूम स्पेशियस हैं, वेल फर्निस्ड हैं. पिछे गँलरीभी हंै!’ म्हणत वॉचमनने दरवाजा उघडला. फ्लँटच्या पूर्व दिशेला गँलरी असल्यामुळं सकाळची नऊ साडेनऊची सूर्यकिरणं थेट बेडरूममध्ये पडत होती. येणारी वाऱ्याची झुळूकही हवीहवीसी वाटत होती. गॅलरीतून खाली डोकावताना हाताला लागलेली धूळ झटकतच मी बोललो,
‘काहो, इतकी घाण कशी काय, कोणी राहत नव्हतं का आधी इथं?’
‘कशाचं कोण? घेतलं तसं धूळ खात पडलंय?’
‘म्हणजे?’
आठ दिवसांपासून घरासाठी परेशान असल्यामुळं मी थोडं नवलाईनंच विचारलं.
‘इन्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवतात हे मोठे लोक अन् मग पडतात धूळ खात!’
‘कुणाचा आहे हा फ्लॅट?’
‘शुब्रा मँडम म्हणून आहे कुणीतरी..’
‘बरं, बाकी जाऊ द्या. भाड्याचं काय?’ मी आपला नेहमीचा, आपुलकीचा अन् जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला.
‘ते तुम्ही त्यांच्याशीच बोला !’ म्हणत वॉचमनने खिशातली डायरी काढत मोबाईल नंबर दिला.
पलीकडून आलेल्या ‘हँलो’ला उत्तर देत मी बोलू लागलो,
‘हँलो मँडम, मी विळेगावकर बोलतोय?’
‘हाँ, बोलीय....?’
‘शुभ्रा मँडम बोलताय ना?’
‘शुभ्रा ही बोल रही हूँ.. बोलीय..?’
‘मँडम मैने वो आपका फ्लॅट देखा था, तिरुपती सोसायटी का?’
‘अच्छा..अच्छा, तो पसंद आया?’
‘हा, चांगला आहे; पण ते भाड्याचं काय?’ पुन्हा माझा आवडीचा, जिव्हाळ्याचा प्रश्न.
‘क्या शुभनाम बोले आपका?’
‘विळेगावकर!’
‘अं..विळेगावकर बोले तो ?’
‘मोरे पाटील विळेगावकर..’ मी तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन स्पष्टीकरण दिले.
‘क्या करते हैं आप?’
‘जी, मैं टिचर हूँ.’
‘ टिचर, ठिक है. रेंट..आठ हजार पर मंथ!’
‘आठ हजार..? आठ हजार खूप झाले मँडम. थोडं व्यवस्थित सांगा ना...!’ मी थोडं लाजत लाजत नेहमीच्या सवयीप्रमाणं भाव करू लागलो.
‘मै आपको एकदम लॅव्हीश फ्लँट दे रही हूँ, वो भी टू बीएचके!’
‘नाही मॅडम, ते खरं आहे, पण बाजूला तर सहा हजारच भाडं आहे.. तर सहा हजार करा..’
‘बाजूवालों से मुझे क्या मतलब? देखो भाई! मै तो आठही हजार लूँगी. रही बात छह हजार.. आठ हजार की, मै जो सनलाईट दे रही, खुली हवाँ दे रही हूँ उसका क्या? दो हजार तो सनलाईट के हो गये !’
ती दहा मिनिटं नुसती बडबडत होती. दोन वर्षांसून निर्मनुष्य असलेल्या तिच्या फ्लॅटचं गुणगान गात होती. मी नुस्ता ऐकत राहिलो. सूर्यप्रकाश भाड्यानं देणाऱ्या बाईला आपण काय बोलणार?
‘ठिक है, मै बोलता आपको बाद मे!’ म्हणत मी मोबाईल बंद केला.
‘ये ऐसाच है साब. खाली रखते लेकीन देते नही किसी को ये लोग.’
वॉचमनने त्याची नेहमीची अडचण बोलून दाखवली.
मी निघताना उगीचच परत गॅलरीत गेलो. एव्हाना सूर्य बर्यापैकी तापला होता. गॅलरीत पडणारी त्याची किरणं हळूहळू छताकडे सरकत होती. मी पटकन आत आलो अन् वॉचमनसोबत मुकाट पायऱ्या उतरू लागलो.

Web Title: Sunlight of two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.