नव्वदोत्तर कवितेविषयीचे साक्षेपी चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:36 IST2018-01-19T19:34:40+5:302018-01-19T19:36:43+5:30

बुकशेल्फ : जागतिकीकरण आणि मराठी साहित्य या संदर्भाने सातत्याने चर्वितचर्वण झालेले आहे आणि होतही आहे. या विषयाचे अनेकविध पैलू असल्याने आणि त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत चालल्याने ही निरंतर चालणारी मंथनक्रिया आहे. वैश्विकीकरणाप्रमाणेच मराठी कवितेचीही स्थिती आहे. आजपर्यंत मराठी कवितेची विविधांगांनी चर्चा झालेली आहे; परंतु एक दीर्घकाळ आणि दीर्घ परंपरा, कालप्रवाहातील विविध वळणे, विविध वृत्ती-प्रवृत्ती, प्रवाह आणि आधुनिकता यामुळे या कवितेची नेकरेषीयता सहज लक्षात येते.

Literary contemplation about post-1990 poetry | नव्वदोत्तर कवितेविषयीचे साक्षेपी चिंतन

नव्वदोत्तर कवितेविषयीचे साक्षेपी चिंतन

- डॉ. कैलास अंभुरे

अलीकडच्या काळात कवितेचे प्रॉडक्शन वाढल्यामुळे तीसंदर्भाने कितीही लेखन झाले तरी त्यातील अपूर्णता नजरेत भरते. अशा स्थितीत कवी, समीक्षक पी. विठ्ठल यांनी ‘जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता’ या पुस्तिकेद्वारे जागतिकीकरणाच्या संदर्भाने नव्वदोत्तर मराठी कवितेचा ऊहापोह केला आहे.

एकीकडे जागतिकीकरण नावाचा अजस्त्र बाहू असलेला कालराक्षस आणि दुसरीकडे भंबेरी उडवणारे अगणित कवितासंग्रह या दोहोंचा समन्वय साधत काही विशिष्ट निष्कर्षाप्रत जाण्याचा प्रयत्न कवी पी. विठ्ठल यांनी प्रस्तुत निबंधाद्वारे केला आहे. समीक्षक प्रकाश देशपांडे केजकर यांनी मराठी कवितेची केशवसुत, मर्ढेकर आणि कोल्हटकर-चित्रे या तीन पर्वात विभागणी केली होती. यानंतरचे चौथे पर्व म्हणून विठ्ठलने नव्वदोत्तर कवितेचा विचार केला आहे. नव्वदोत्तर कविता ही सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक अशा अनेकविध अंगांनी बदललेली आहे. त्यामुळे या अनेकविधतेचा वेध घेताना निबंधकाराने सदानंद देशमुख, अजय कांडर व मन्या जोशी या तीन वेगळ्या प्रदेशातील पर्यावरण, संस्कृती व सामाजिक वैविध्य असलेल्या लेखक-कवींच्या मनोभूमिकांचा आधार घेतला आहे.

यापैकी एकजण महानगरी परिघातील तर दोघे ग्रामीण पर्यावरणातील आहेत. त्यांची विधानं ही समकाळातील एकूण कविता आणि जागतिकीकरण याविषयीची परिगृहीतकं आहेत. सदानंद देशमुख, अजय कांडर आणि स्वत: निबंधलेखक यांची मतं क्रमश: अशी- (१) ‘‘खेडी म्हणजे देशातल्या पेशी आहेत. शरीरातल्या पेशी नासल्या की, जसा कँसर होतो, त्याप्रमाणे खेडी नासल्यामुळे संबंध व्यवस्थाच मरणपंथाला लागल्यागत वाटतेय.’’ (२) ‘‘आज सर्वत्र विकासाचे मोठमोठे प्रकल्प आणले जात आहेत; पण जमीनमालकाला जमिनीचा हक्क सोडण्यासाठी गृहीतच धरले जाते किंवा असे मोठे प्रकल्प त्याच्या जमिनीवर उभारले जाणार आहेत, याची त्याला जाणीवही करून दिली जात नाही. भूमीवर मालकी हक्क असणार्‍या माणसाला आता भूमिहीन केले जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी भूमिहीनांच्या बळाचा वापर केला जात आहे. एकमेकांशी लढणारे दोघेही भूमिहीन होतात आणि कालांतराने राजकीय व्यवस्थेच्या दावणीला बांधले जातात.’’ (३) ‘‘शेती आणि संगणक ही जी दोन साधनं आहेत. त्यापैकी शेती हा जगण्याच्या अपरिहार्यतेचे तर संगणक कसे जगावे हे सांगणारे साधन आहे. आपले प्राधान्य शेतीला असायला हवे होते, दुर्दैवाने ते संगणकाला आहे.’’ ही तीन उद्धृतं स्थिती, गती आणि प्रगती(?) याविषयी येतात. विठ्ठलने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या कवींचा व कवितेचा १२ एकांक आणि केवळ ३५ पृष्ठांद्वारे परामर्श घेतला आहे. हे विशेष.

- जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता 
- लेखक : पी. विठ्ठल
- अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे

Web Title: Literary contemplation about post-1990 poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.