शेतीकाम... शब्दनाम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:44 IST2018-07-21T15:41:44+5:302018-07-21T15:44:22+5:30
बळ बोलीचे : शेतीचा धंदा घड्याळाच्या काट्यावर चालत नसतो. अवघ्या आयुष्याचे समर्पण तिथे द्यावे लागते. माणसे अहोरात्र तिथे राबत असतात. घाम गोठत नाही आणि कष्ट हटत नाहीत. नोकरी करणे आणि शेती करणे याचा तुलनात्मक अभ्यास होऊ शकत नाही. कारण, शेतीक्षेत्रात रिटायरमेंट नाही. त्याचप्रमाणे या शेती नावाच्या संस्कृतीने समाजाला एक विशाल अशा स्वरूपाची वस्तुसंस्कृती दिलेली आहे. शब्दसंस्कृती दिलेली आहे. इथे शेतीला केंद्रवर्ती ठेवून काहीएक अपरिचित शब्दांचा उत्सव भरविणे, हा या लेखामागचा प्रधान उद्देश आहे.

शेतीकाम... शब्दनाम...
- डॉ. केशव सखाराम देशमुख
आमच्याकडील शेती पावसाचा जुगार झाली. पाऊस पडला तर पिकते; अन्यथा ढगाला बोलविण्याची पाळी येते. ढग रुसले की, शेती गोत्यात येते. वस्तुत: ढगांचे रुसणे कोणत्याच जैविक व्यवस्थेला परवडणारे नसते. आमच्याकडील प्रधान शेती कोरडवाहू आहे. जलसंधारणाचे सुख आमच्या सगळ्या जमिनीच्या नशिबात लिहिलेले नाही. त्यामुळे जून-जुलैच्या काळात पेरणी लावणीचे, निंदण खुरपणाचे काम वेग घेते. सगळे गाव या हंगामात शेतांवर कार्यशील असते. वडीलधारी, वयोवृद्ध माणसे तेवढी पेरणीच्या या काळात घरी असतात. बाकी गाव शेतांवरच थांबून असते.
पुढच्या वर्षभराच्या भाकर-पाण्याची सोय आता शेतांवर थांबले तरच होते. म्हणून ‘पेरणीचे दिवस’ हे खेड्यांसाठी भविष्याच्या वाटा उजळवणारेच असतात. ‘शेती’ हा एक शब्द आहे; पण तो मोठा सर्जनशील, संस्कृतीसंपन्न आणि भाषेच्या व्यवहारातला वजनदार असा आहे. आता सध्या शेतीकामाची लगबग आहे. कुठे पेरण्या झाल्या. कुठे सुरू आहेत. लोक शेतात घाम सांडत आहेत. पावसाची तहान लोकांच्या डोळ्यांत उतरू लागली आहे. अशा प्रसंगी ‘शेतीकाम-शब्दनाम’ असा घोष या लेखाच्या मुळाशी ठेवला आहे.
शेतात औतफाटा गावातून शेताकडे नेण्यासाठी इंग्रजी ‘व्ही’ आकाराचे साधन वापरले जाते. त्यावर वखर, नांगर, मोगडा, तिफण ही अवजारे ठेवून ती शेतांवर बैलांच्या साहाय्याने नेली जातात. त्या ‘व्ही’ वस्तूला ‘काढोन’ म्हणतात. शेतात पीक भरू लागले की, बैलांना पिकांत मोकळे जाऊ दिले जात नाही. बैलांना पीक खाऊ दिले जात नाही. गवत गावाचा चारा किंवा कडबा त्यांना खायला असतो. पिकात तोंड घालू नये म्हणून बैलांच्या तोंडाला जाळीदार एक तागाची टोपली बांधतात. त्याला ‘मुचके’ असे नाव आहे. त्याला मुंगसे असेही काही भागांत म्हटले जाते. जुवाला बैल जोडले जातात, तेव्हा जुवाच्या दोन्ही टोकाला दोन लोखंडी वा लाकडी रूळ वापरतात. ज्यामुळे बैल जुवापासून दूर होत नाही. त्या खुंट्यांना ‘शिवळा’ असे सुंदर नाव आहे. या शिवळांशी जोडणारा आणि बैलांच्या गळ्याभोवती एक पट्टा बांधला जातो त्याला ‘बेल्ड्या’ म्हणतात. काही ठिकाणी त्याचे ‘जोते’ असे दुसरे नाव आहे. औतफाटा यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, उदा. धांद, कासरा, वार्ती, जू, शिवळा, बेल्ड्या आणि अजून चार-दोन वस्तू यांची जुडी असते. त्या एकत्र वस्तूला एक एकत्रनाम आहे. ते म्हणजे ‘जुपन’ किती गोड शब्द आहे हा! असे सुंदर नाव आहे.
चामड्यापासून बनवलेला जो मजबूत दोर बनवला जातो जो की, औतफाटा, बैलगाडीकरिता वापरला जातो. त्याला ‘वारती’ म्हणतात. असाच दोर अंबाडीच्या तागांपासून बनवला जातो. त्याला ‘धांद’ म्हणतात. हल्ली या धांदी नायलॉनच्या बाजारात मिळतात. ‘सोल’ असेही त्यालाच म्हटले जाते. ही धांद मल्टिपर्पज असते. औत, नांगर, गाडीबैल, झोका, विहिरीतून पाणी काढणे, बाजारात शेतमाल विकायला नेणे- अशा हजार कामांसाठी धांद वापरली जाते. एका तिफणीला पेरणीच्यावेळी किती तरी वस्तूंचा साज चढवला जातो. (कवी इंद्रजित भालेरावांनी यासंबंधीचे त्यांच्या कवितेत केलेले वर्णन सौंदर्यलक्ष्यी आहे.) एक तिफण; पण तिच्या अंगावर ‘रुमणं, जानोळं, मोघं, चाडं, नळे, खोळ, वार्ती, कासरा, जू, इड्या, दांड्या, फारोळं, इळ्ळत, काठी, शिवळा, बेल्ड्या, येसन, मुचके’ या टोपलंभर वस्तू एका तिफणीभोवती किंवा एका मोगळ्याभोवती जोडाव्या लागतात. कामानुसार त्यांची बेरीज अथवा वजाबाकी कास्तकाराला करावी लागते.
ही अवघी शेतीची अवजारे म्हणजे शब्दकोशाचा एक एक खंड बनावा अशी आहेत. वखराला दोन पाय आहेत. जे जमिनीत घुसतात. त्यांना ‘जानोळे’ म्हणतात. या दोन पायांच्या बुडाला वर्तुळाकार गोल, लोखंडी बेड्या लावतात. त्यांना ‘इड्या’ म्हणतात. (इडा पिडा टळो- त्यातून तर आले नसावे?) ज्यामुळे रान ‘वखरले’ (विंचरले जाते). त्या वखराच्या पायाला समांतर जोडलेली एक लोखंडी जाड पट्टी असते. ती थोडीशी इंग्रजी ‘सी’ आकाराची असते. तिला ‘पास’ म्हणतात. या पासेला तणगवत कचरा अडकून येतो. तो चालत्या औताला थांबवून काढून टाकला जातो. त्याला ‘वसन’ असे अप्रतिम नाव आहे. हे वसन (गवतकचरा) ज्या साधनाने काढले जाते ते साधन लांब काठीच्या खालच्या टोकाला ठोकून बसवले जाते. त्याला ‘इळ्ळत’ असे काव्यात्मक नाव आहे.
शेतात पेरलेले पीक वाढते. असे ‘बाळपीक’ शेतात हसू लागले की, पिकांच्या तासांत (तास=रांगा) तण माजते. गवत वाढते ते काढून टाकावे लागते, ज्याकारणे पिकाची वाढ मस्त होते. पिकातून तण काढण्यासाठी छोटे औत (वखराचे पिलू) वापरले जाते. त्याला ‘डौरे’, ‘दुंडे’ म्हणतात. पेरणीच्या काळात, पेरणीसाठी मोघे वापरतात. तिफण, मोगडा वापरतात. जमिनीत बी नीट पडले की, ‘पेरणे’ आणि जमिनीत बी पडले नाही की ते ‘बेरणे!’ ‘बेरणे’ या शब्दातून निष्फळता प्रकट झाली. पेरण्यामधून सर्जकस्वरूपाची सफलता दिसते. एक शेती, एक माती; पण तिची महती विलक्षण श्रेष्ठ आणि पवित्र अशी आहे. शेतीकाम सुरूअसताना तिथे कार्यसिद्धी तडीस नेण्यासाठी गाडीभर वस्तू मौजूद असतात. त्या प्रत्येक वस्तूचा नाममहिमा भाषिकदृष्ट्या रत्नांची खाण म्हणावी असा आहे.
समाज, भाषा, संस्कृती, जीवन आणि सर्जन म्हणून या वस्तुनाम शब्दांनी आमची भाषिक संस्कृती टवटवीत ठेवली आहे! शेतीकामाचा सुंदर साथीदार ‘बैल!’ या बैलांवर शेतीचा गाडा कोरडवाहू रानांवर अपरंपार चालत आला आहे. या बैलांभोवती शब्दांचा मोठा महोत्सव वाचायला मिळतो. ‘वृषभसूक्त’ हा विठ्ठल वाघ यांचा काव्यसंग्रह आपण वाचला म्हणजे कृषिभाषिक एक नवी संस्कृती आपल्या भेटीला येते! ‘एक शेतीकाम; पण अनेक शब्दनाम’ असे वर्णन त्यासंबंधी केले, तर ते अनाठायी ठरणार नाही.
( keshavdeshmukh74@gmail.com )