तुमसरचे उपजिल्हा रुग्णालय असुरक्षित
By Admin | Updated: March 13, 2015 00:41 IST2015-03-13T00:41:34+5:302015-03-13T00:41:34+5:30
रुग्णालयाच्या सुरक्षेकरिता शासनाने शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात पोलीस चौकी (नियंत्रिण कक्ष) लावली होती.

तुमसरचे उपजिल्हा रुग्णालय असुरक्षित
तुमसर : रुग्णालयाच्या सुरक्षेकरिता शासनाने शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात पोलीस चौकी (नियंत्रिण कक्ष) लावली होती. परंतु येथे कर्तव्यावर पोलीस कधीच दिसत नाही. याचा फायदा शहरातील असामाजिक तत्व घेत आहेत. रात्री येथे त्यांचा धुडगूस सुरु असतो. रुग्णालयातील खिडकीची काचेची तावदाने त्यांनी फोडली आहे. येथे असुरक्षिततेचे वातावरण आहे.
तुमसर शहर व तालुक्याकरिता राज्य शासनाने १०० खाटांचा सुसज्जीत रुग्णालय सुरु केला आहे. शासनाने येथे पोलीस चौकी सुरु करण्याचे आदेश दिले. पोलीस चौकी (नियंत्रण कक्ष) एका खोलीत रुग्णालयाच्य दर्शनी भागात सुरु केले. परंतु येथे कर्तव्यावर पोलीस कर्मचारी दिसत नाही. केवळ कागदावरच हे नियंत्रण कक्ष सुरु आहे.रात्री याचा फायदा असामाजिक तत्व घेतात. रुग्णालयाच्या अनेक काचेच्या खिडक्या येथे फुटलेल्या स्थितीत आहणेत. रात्री मद्यपींचा येथे नेहमीच धुडगूस सुरु असतो.
रुग्णालय परिसरात असुरक्षिततेचे वातावरण असते. रात्री या रुग्णालयात रुग्ण, त्यांचे नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी कर्तव्यावर असतात. त्यांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे.
पोलीस चौकी नियमित सुरु राहावी याकरिता रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.सचिन बाळबुद्धे यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला कळविले. तरी सुद्धा येथे नियमित पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. रुग्णालयाची सेवा अत्यावश्यक सेवा समजली जाते. या अत्यावश्यक सेवेकरिता निदान पोलीस प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींचे येथे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. एखादा अप्रिय घटनेची वाट तर पोलीस प्रशासन पाहात नाही ना? असा प्रश्न येथे उपस्थित होतो. (तालुका प्रतिनिधी)