डोळ्यात मिरची पावडर फेकून भरदिवसा भंडारा जिल्ह्यात तरुण व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 20:23 IST2022-06-10T20:14:57+5:302022-06-10T20:23:40+5:30

भंडारा जिल्ह्यात भरदिवसा खुलेआम एका ३० वर्षीय तरुण व्यापाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

Young trader brutally murdered all day in Bhandara district by throwing chilli powder in his eye |  डोळ्यात मिरची पावडर फेकून भरदिवसा भंडारा जिल्ह्यात तरुण व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

 डोळ्यात मिरची पावडर फेकून भरदिवसा भंडारा जिल्ह्यात तरुण व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

भंडारा : गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक उरला नसल्याचे पुन्हा एकदा शुक्रवारी स्पष्ट झाले. भरदिवसा खुलेआम एका ३० वर्षीय तरुण व्यापाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. राहुल ऊर्फ बंटी लालचंद जयस्वाल (३०) रा. टाकळी असे मृताचे नाव आहे. राहुल हा हार्डवेअर व रेती विकण्याचे काम करायचा. ही थरारक घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास भंडारा-वरठी राज्य महामार्गावर गणेशनगरी समोर घडली.

फिल्मी स्टाईलने घडलेल्या या गुन्ह्याच्या छडा पोलिसांनी त्यापेक्षा जास्त वेगाने लावला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी राकेश तिरपुडे यांच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कचरू चोपकर रा. शुक्रवारी व बग्गा गाते रा. हलदरपुरी यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. बातमी लिहिपर्यंत आरोपीना अटक व्हायची होती.

राहुल हा नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने कोथुर्णा येथे गेला होता. काम आटोपून परत येत असताना दाभा फाट्या समोरील पेट्रोल पंपसमोर त्याला काही लोकांनी हाक दिली. ते परिचित असल्याने तो थांबला. गप्पा सुरू असताना एकाने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. डोळ्यात आग होताच राहुल दुचाकीवरून खाली कोसळला. मारेकऱ्यांनी नेमका डाव साधला. राहुल खाली कोसळताच धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून केला. तो मृत झाल्याची खातरजमा केल्यावर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. महामार्गावर खून होण्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सकाळची वेळ असल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू होती. खुनाचा अनेकांनी लाईव्ह अनुभव घेतल्याचे कळते. भरदिवसा निर्धास्त खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम घटनास्थळावर ताफ्यासह दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून नातेवाईकाकडून माहिती घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवल्याने अवघ्या काही तासात पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध घेण्यात यश मिळाले.

Web Title: Young trader brutally murdered all day in Bhandara district by throwing chilli powder in his eye