तुमसर : सराफा व्यापारी संजय सोनी तिहेरी हत्याकांड राज्यभरात गाजले होते. त्याला दि. २६ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. याप्रकरणात तुमसर पोलीसांनी ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या हत्याकांडातील सातही आरोपींना अजूनपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली नाही. मुद्देमालासह २४ तासात आरोपींना पोलीसांनी अटक केली होती. या दरोडा प्रकरणात ३९ लाख रोख, ८ किलोग्रॅम सोने, चांदी असे २ कोटी ९ लाख किंमतीचा ऐवज हस्तगत केला होता.शहरातील रामकृष्ण नगरातील सोनी यांच्या घरी सात दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. यात संजय सोनी (४७) यांचा तिरोड्याजवळ रात्री गळफास लावून खून केला. नंतर तुमसर येथील घरी पत्नी पूनम सोनी (४३) व मुलगा द्रुमील (११) यांची हत्या केली होती. तुमसर येथून ४ व नागपूरातून ३ आरोपींना २४ तासात पोलीसांनी अटक केली होती. हे तिहेरी हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजले होते. माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नामुळे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट (जलद) न्यायालयात सुरु झाला. तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची शिफारस खटला चालविण्याकरिता केली होती. राज्य शासनाने अॅड.निकम यांची नियुक्ती केली आहे. आरोपींना अजूनपर्यंत शिक्षा न झाल्याने सराफा व्यापाऱ्यांत रोष व्याप्त आहे.आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ खून करणे, ३९६ खुनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरिता गृहप्रवेश, १२० फौजदारी कट रचणे, २०१ पुराने नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपपत्रात ९९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आलेल्या आहेत. येथे आरोपींच्या वकीलीसाठी वकीलांनी नकार दिला होता. शहरात महिला संघटनांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. मोर्च्यात विविध संघटनांचाही समावेश होता. मृतक संजय सोनी यांच्या देखणा बंगला अगदी ओसाड पडला आहे. आलीशान वास्तू मागील एक वर्षापासून कुलूपबंद आहे. संजय सोनी यांच्या कुटुंबातील एकमेव त्यांची मुलगी हिरल सोनी बचावली. हत्याकांडाच्या दिवशी ती मामाकडे अकोला येथे गेली होती. (तालुका प्रतिनिधी)रक्तदान शिबिर व कँडल मार्चसोनी हत्याकांडाला दि. २७ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. सराफा संघ तुमसर व मोहाडी संघाच्या वतीने दि. २७ रोजी सकाळी १० ते दु. ४ विवेकानंद नगरातील पितृस्मृती भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ६.३० वा. कँडल मार्च काढण्यात येणार आहे. या कँडल मार्चला नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सराफा असोसिएशन, जेसीआय, लायंस क्लब, नगरपरिषदेने केले आहे. या हत्याकांडाची आठवणी अद्याप ताज्या आहेत. केवळ आठवणीने अंगाचा थरकाप उडतो. अशा भावना नागरीकांनी व्यक्त केल्या.
तुमसरातील सोनी हत्याकांडाला वर्ष पूर्ण
By admin | Updated: February 26, 2015 00:22 IST