भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; शिक्षिकेचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:49 IST2021-12-16T12:54:51+5:302021-12-16T13:49:35+5:30
भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कारधा टोल नाकाजवळ आज सकाळच्या सुमारास घडली.

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; शिक्षिकेचा जागीच मृत्यू
भंडारा : दुचाकीने शाळेत जात असलेल्या एका शिक्षिकेला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. यात ५६ वर्षीय शिक्षिकेचा जागीच अंत झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कारधा टोल नाकाजवळ घडली.
रेखा बक्क्षीमल नागोरी रा. गुजराती कॉलनी, भंडारा असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या पंचायत समिती भंडारा अंतर्गत येणाऱ्या इटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत वरिष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आज गुरुवारी आपल्या एक्टिवाने सकाळी १० च्या सुमारास त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या. दरम्यान, कारधा टोलनाका जवळील चौरस्त्यावर वळण घेत असतानाच भरधाव वेगाने येणार्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रेखा नागोरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती कारधा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.