एस.टी.त महिलेने दिला बाळाला जन्म

By Admin | Updated: July 19, 2014 23:46 IST2014-07-19T23:46:21+5:302014-07-19T23:46:21+5:30

भंडाऱ्यात वैद्यकीय उपचार घेऊन बसने गावाकडे परतत असताना अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यातच धावत्या एस.टी. मध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला.

The woman gave birth to a child in ST | एस.टी.त महिलेने दिला बाळाला जन्म

एस.टी.त महिलेने दिला बाळाला जन्म

बाळ-बाळंतिण सुखरुप : भंडारा-लाखांदूर बसमधील घटना
किटाडी : भंडाऱ्यात वैद्यकीय उपचार घेऊन बसने गावाकडे परतत असताना अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यातच धावत्या एस.टी. मध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला.
१८ जुलैच्या सायंकाळी भंडारा आगाराची बस क्र.एम.एच. ४० - ८४३१ भंडाराहून विरलीकडे निघाली. त्याच बसमध्ये मेघा योगराम मेश्राम रा.पालेपेंढरी भंडारा येथून वैद्यकीय उपचार घेऊन गावाकडे जात होती. यावेळी तिचा पती सोबत होता. कातुर्ली ते मासळ मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे तिला प्रसुतीच्या वेदना असह्य होऊ लागल्या. त्यामुळे योगराम मेश्राम यांनी वाहक विलास मेश्राम यांना बस थांबविण्याची विनंती केली.
त्यानंतर वाहकाने चालक टी. हटवार यांनी बस बोरगाव शिवारात रस्त्याच्या कडेला थांबवून पुरुष प्रवाशांना बसखाली उतरविण्यात आले. त्याचवेळी एस.टी.तील प्रवाशी महिलांना मदतीसाठी दिले. वाहक मेश्राम यांनी याबाबतची सूचना आरोग्य विभागाच्या १०२ या क्रमांकावर दिली. यात बस असलेले ठिकाण, मातेचे नाव, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा पत्ता दिला.
मात्र १०२ डायल नंबरवर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांकडून आम्ही प्रयत्न करतो एवढेच उत्तर वाहकाला मिळाले.
एक तासपर्यंत रुग्णवाहिकेची कोणतीही सोय झाली नव्हती. त्याठिकाहून आरोग्य केंद्र दूर असल्यामुळे अखेर या मातेने एस.टी.तच गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूतीदरम्यान रक्तस्त्रावामुळे मातेची प्रकृती खालावली. घटनेचे गांभीर्य ओळखून वाहकाने एस.टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन माता व बाळाला बेलाटी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. तिथून मातेला पुढील उपचाराकरिता लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
शासनाने अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केलेली आहे. आरोग्यासाठी १०२ आणि १०८ टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आले. परंतु या योजनांची अंमलबजावणी होण्यात अडचणी येत असल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांना याबाबत सांगितले असता त्यांनी या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The woman gave birth to a child in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.