बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळणार का?
By Admin | Updated: July 27, 2016 00:37 IST2016-07-27T00:37:47+5:302016-07-27T00:37:47+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांचे मनोरंजनाचे साधन व महाराष्ट्राच्या ऐतिहासीक वसा म्हणून शंकरपट प्रचलीत आहे.

बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळणार का?
अधिवेशनात विधेयक : प्रकाश जावडेकरांचे आश्वासन
साकोली : ग्रामीण भागातील नागरिकांचे मनोरंजनाचे साधन व महाराष्ट्राच्या ऐतिहासीक वसा म्हणून शंकरपट प्रचलीत आहे. मात्र या शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यामुळे पटशौकीनात निराशा आहे. यासंदर्भात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडून कायद्यात सुधारणा करून बैलगाडीच्या शर्यतींना परवानगी देऊ असे आश्वासन केंद्र मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी मालक-चालक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
बैलगाडी शर्यतीसंबंधी विविध संघटनेने मागण्यांचे निवेदन ना.प्रकाश जावडेकर यांना दिले. मागील दोन वर्षापासून या शर्यतीवर बंदी असल्याने बैलांच्या शर्यती बंद आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात भारताचे राजपत्र काढून या शर्यतींना परवानगी दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या बंदी आदेशानुसार पुन्हा या शर्यतीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा पावसाळी अधिवेशनात सरकार प्रयत्न करणार असून बैलबंडी शर्यतीसंदर्भात विधेयक मांडून कायद्यात बदल करून घेऊ न लवकरच बैलबंडी शर्यती सुरु करण्याचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन ना. जावडेकर यांनी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कराड, सोलापूर, मंचर, माळसिरस तसेच विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, बुलठाणा, अमरावती येथील बैलगाडी मालक चालक संघटनेचे पदाधिकारी यांना दिले, असे साकोलीचे याचिकाकर्ता प्रभाकर सपाटे, शंकरपटाचे आयोजक जगत रहांगडाले यांनी पत्रकातून कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)