काळ्या फिल्मच्या वाहनांवर कारवाई कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:37 IST2016-03-28T00:37:12+5:302016-03-28T00:37:12+5:30
हेल्मेट न घातलेल्या वाहनचालकांवर करण्यात येत असलेल्या सक्तीच्या कारवाईप्रमाणेच वाहतूक पोलिसांनी काळी फिल्म लावलेल्या...

काळ्या फिल्मच्या वाहनांवर कारवाई कधी?
सामाजिक संघटनांची मागणी : सर्वोच्च न्यायालयाची बंदी
तुमसर : हेल्मेट न घातलेल्या वाहनचालकांवर करण्यात येत असलेल्या सक्तीच्या कारवाईप्रमाणेच वाहतूक पोलिसांनी काळी फिल्म लावलेल्या कारचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली. उन्हाळ्यात फिल्म लावण्याचे प्रमाण वाढते. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यास रस्त्यांवर पारदर्शक काचांच्या कार धावतील, असे मत संघटनांनी व्यक्त केले.
शहरात कारची संख्या वाढली आहे. दर महिन्यात ४०० पेक्षा जास्त कार रस्त्यांवर धावत आहेत. नवीन कार विकत घेतल्यानंतर काही दिवसांत काचांना अवैधरीत्या काळी फिल्म चढविली जाते. कारवाई करण्यास पोलीस धजावत नसल्यामुळे अशा कारची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतमध्ये कोण बसले आहेत, याची शहानिशा होत नसल्यामुळे शहरात गुंडांचे राज्य असल्याच्या तक्रारीसुद्धा वाढल्या आहेत. अवैधरीत्या फिल्म लावलेल्या कारचालकांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
चारचाकी गाड्यांवरील काचांना काळी फिल्म लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्यानंतरही शहरात काचांना काळ्या गडद फिल्म लावून चारचाकी फिरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही वाहतूक पोलीस अशा चार चाकींवर कारवाई करीत नसल्याचे दिसून येते. अपहरण, दरोडे आणि गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रतिबंधक उपाय म्हणून अवैधरीत्या काळी फिल्म असलेल्या कारवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
बंदी असतानाही वाहनांवर काळ्या फिल्मचा थर दिसून येत आहे. अशा चारचाकी बहुतांश लोकप्रतिनिधी, बडे उद्योजक, राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे पोलीस कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांची कारवाई सर्वसामान्यांपुरती मर्यादित असू नये, शिवाय या कारवाईतून कुणालाही वगळू नये, अशी नागरिकांची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मे २०१२ पासून काचांवर काळी फिल्म लावण्यास किंवा ७० टक्क्यांहून कमी पारदर्शकता असलेल्या गाड्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. पण, काचांवरील काळ्या फिल्मची पारदर्शकता मोजण्याचे कुठलेच यंत्र नसल्यामुळे आणि संबंधित यंत्रणा सुस्त असल्याने गडद काळी फिल्म लावलेली वाहने बिनधास्तपणे सुसाट वेगात धावतात. (तालुका प्रतिनिधी)
फिल्म लावणाऱ्यांचा धंदा जोरात
काळ्या काचा असलेल्या या कारमध्ये अनेक प्रकार अवैध कृत्य होतात. असे असतानाही पोलीस प्रशासनाच्यावतीने कुठलीच कारवाई होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरुवातीला काही काळ जोरदार मोहीम राबविली. कालांतराने ही मोहीम थंड पडली. पोलीस कारवाई करीत नसल्याने काळ्या फिल्म लावून देणाऱ्या दुकानदारांचे धाडस वाढले असून धंदा जोरात आहे.