भारनियमनाने धान पिकाला धोका
By Admin | Updated: August 7, 2016 00:24 IST2016-08-07T00:24:39+5:302016-08-07T00:24:39+5:30
लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा व परिसरात विद्युत भारनियमनामुळे कृषीपंपधारक शेतकरी धान उत्पन्नापासून वंचित राहण्याची भीती आहे.

भारनियमनाने धान पिकाला धोका
शेतकऱ्यांमध्ये असंतोष : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचा पुढाकार
लाखनी / सालेभाटा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा व परिसरात विद्युत भारनियमनामुळे कृषीपंपधारक शेतकरी धान उत्पन्नापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने याविरूध्द एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांची धान रोवणी अजूनही खोळंबलेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात बोअरवेल्सची सोय केली. दोन महिने लोटून गेली तरी परिसरातील गोंडसावरी, रेंगेपार कोठा, दैतमांगली, राजेगाव, मोरगाव, केसलवाडा पवार, चिखलाबोडी, परसोडी, सोमलवाडा, मेंढा आदी गावात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.
वीज वितरण कंपनीने १६ तास भारनियमन केल्याने केवळ आठ तासात शेतकऱ्यांची तहान भागत नाही. भरनियमनाचे वेळापत्रकही शेतकऱ्यांची झोप उडविणारे असल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. रब्बी पीक घेवून डोक्यावरील कर्जाचा बोझा कमी होईल या आशेने कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी कंबर कसली होती. परंतु विद्युत वितरण कंपनीच्या तघुलकी धोरणाचा अखेर शेतकऱ्यांनाच फटका बसला. परिसरात २४ तास विद्युत पुरवठा चालू राहणे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना रेंगेपार कोठा यांनी विद्युत भारनियमनाविरूद्ध बंड पुकारले आहे. परिसरात २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. परंतु त्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे दिसून येत आहे. १६ आॅगस्टपर्यंत १६ तासाचे विद्युत भारनियमन बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा माणिक टिचकुले, मोहन बुराडे, मोरेश्वर भूते, रतिराम हजारे, श्रीहरी पिंपळशेंडे, तेजराम चोपकर, विनोद रोटके, नंदलाल काटगाये आदींनी दिला आहे.
(तालुका प्रतिनिधी) /वार्ताहर)
भारनियमनाने जनता त्रस्त
पावसाळ्याचे दिवस सुरु असतानाही जिल्ह्यात शहरी तथा ग्रामीण भागात भारनियमनाचा बडगा उगारण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सिंचनाची व्यवस्था होत नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. तर या भारनियमनामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळेस श्वापदांमुळे जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.