२० वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षा

By Admin | Updated: December 18, 2015 00:58 IST2015-12-18T00:58:38+5:302015-12-18T00:58:38+5:30

तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी शासनातर्फे चुलबंद नदीवर २० वर्षांपूर्वी निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले.

Waiting for a consideration of 20 years | २० वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षा

२० वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षा

प्रकरण निम्न चुलबंद प्रकल्पाचे
संजय साठवणे साकोली
तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी शासनातर्फे चुलबंद नदीवर २० वर्षांपूर्वी निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र या २० वर्षात हा प्रकल्पही पूर्ण झाला नाही. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही मिळाला नाही. एकीकडे शासन जलयुक्त शिवार योजनेवर भर देत आहे. मात्र हा प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असतानाही या प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
साकोली जवळील कुंभली येथील चुलबंद नदीवर, निम्नचुलबंद प्रकल्पाला महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे २९ एप्रिल १९९५ रोजी ४ हजार १६७.७३ लक्ष रूपयाचे अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या प्रकल्पाकरिता ९० हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता असल्याने नदीकाठाजवळील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. यात गडकुंभली, वडद, लवारी या गावातील शेतीचा समावेश आहे. यापैकी वडद येथील २९.४२ हेक्टर शेतजमीन वडद येथील शेतकऱ्यांची आहे. शासनातर्फे गडकुंभली, लवारी या गावातील शेतकऱ्याकडे जमिनीचा मोबदला दिला असून वडद येथील शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला अजूनपर्यंत दिला नाही.
या प्रकल्पासाठी चुलबंद नदीवर दोन्ही तिरावर मातीचे घरत व नदीचे पात्रात १०८ मीटर लांबीचे धरण बांधून १२ बाय ६ मीटरचे ७ दरवाजे बसविण्यात आले आहे. या प्रकल्पापासून साकोली तालुक्यातील कुंभली, धर्मापुरी, सावरबंध, बोंडे, खंडाळा, वडद, सुकळी, महालगाव, शिवनीबांध, साखरा, वटेटेकर, सासरा, नेहारवानी, कटंगधरा, विहीरगाव, गडकुंभली, सेंदुरवाफा, पाथरी, खैरलांजी, साकोली, जमनापुर, पिंडकेपार, बोदरा या २३ गावातील ५ हजार ९९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. सद्यस्थितीला या प्रकल्पाचे काम ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित कामासाठी अजुन जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात पंपहाऊसचे काम अर्धे बाकी असून कॅनलसह काही कामे अपूर्ण आहेत.

तलावात सोडले जाणार पाणी
या प्रकल्पातून अडविलेले पाणी पंपहाऊस द्वारे पाणी कालव्यात टाकण्यात येईल व कालव्याद्वारे हे पाणी तलावात सोडून शेतीला मिळणार आहे.
पाणी अडविले
सण २०१२-१३ ला या प्रकल्पात पाणी अडविण्यात आले होते. त्यावेळी वडद परिसरातील शेती पूर्णता पाण्यात बुडाली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी शेतीचा मोबदला व नुकसान भरपाई मागितली होती. मात्र २० वर्षापासून शेतीचा मोबदलाही मिळाले नाही आणि नुकसान भरपाईची सुद्धा मिळाली नाही.
अधिकारी प्रभारी
साकोली येथील पाटबंधारे विभागात मागील तीन वर्षापासून उपविभागीय अभियंता हे प्रभारी आहे. प्राभारी अधिकाऱ्यांमुळेही या प्रकल्पाला ग्रहण लागले. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली नाही. शासनाने या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी पुर्णवेळ अभियंता द्यावा.

Web Title: Waiting for a consideration of 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.