पाणलोट समितीची शेळी पालन केंद्राला भेट
By Admin | Updated: December 16, 2015 00:40 IST2015-12-16T00:40:34+5:302015-12-16T00:40:34+5:30
वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत उपजिविका अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

पाणलोट समितीची शेळी पालन केंद्राला भेट
अभ्यास सहल : बचत गटाच्या महिलांचा सहभाग
भंडारा : वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत उपजिविका अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कक्ष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प कार्यान्वीत यंत्रणा तालुका कृषी अधिकारी मोहाडी व विश्व मानव कल्याण मिशन गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने क्लस्टर क्रमांक ६ मधील उपजिविकेचा हा अभ्यास दौरा आयोजित केला होता.
या अभ्यास दौऱ्यात चिचोली, कान्हळगाव, वडेगाव येथील १५० नागरिंकांचा समावेश होता. या अंतर्गत तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील तुलाराम बिसेन यांनी वयक्तीक शेळीपालनातून साध्य केलेली प्रगती याविषयी माहिती देण्यात आली. बचत गटातील महिलांना शेळीपालन व गाय पालन व्यवसायातून दुग्ध दुपट व गोमित्र व्यवसायाची प्रेरणा देण्यात आली.
या सहलीतील महिलांना माहिती देताना बिसेन यांनी २००५ मध्ये १० शेळ्या व एक बोकड घेवून हा व्यवसाय प्रारंभ केल्याची माहिती दिली. यातून त्यांनी उत्तरोत्तर प्रगती साधली असून आता त्यांचा व्यवसाय पाच लाख रूपयांच्या घरात पोहचला आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेता त्यांनी ही व्यवसाय क्रांती घडवून आणल्याचीही यावेळी त्यांनी सांगितले.
या सहलीसाठी तालुका कृषी अधिकारी के.जी. पात्रिकर, नरेंद्र गणवीर, किशोर कळंबे, सेवक चिंधालोरे, बी.डी. दुधानी आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)