निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा संकटात
By Admin | Updated: July 19, 2014 23:46 IST2014-07-19T23:46:43+5:302014-07-19T23:46:43+5:30
पवनी तालुक्यात मागील एक महिन्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने बळीराजा निसर्गाच्या चक्रव्युहात सापडला असून पुन्हा कर्जाच्या डोंगरात सापडलेला आहे. पालोरा, लोणारा, बाम्हणी, मोखारा,

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा संकटात
पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यात मागील एक महिन्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने बळीराजा निसर्गाच्या चक्रव्युहात सापडला असून पुन्हा कर्जाच्या डोंगरात सापडलेला आहे. पालोरा, लोणारा, बाम्हणी, मोखारा, खैरी (दिवाण) भागात ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांचे रोवणी संपत आली आहे. मात्र कोरडवाहू शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
दोन दिवसापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. याचा फायदा रोवणी केलेल्या शेतकऱ्यांना झाला. पुन्हा पावसाने दडी मारली. पहिल्यांदा दुसऱ्यांदा पेरणी वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. भारनियमनामुळे रोवणी झालेल्या शेतामध्ये भेगा पडत आहेत. या भागात अनेक कोरडवाहू शेतकरी आहेत.
हे शेतकरी निसर्गाच्या दहशतीखाली जीवन जगत असल्याचे बोलके चित्र पहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसापासून पाऊस दमछाक करीत आहे. आजही ज्या नागरिकांनी निसर्गाचा हा अस्मानी रौद्ररुप बघितला त्यांनी आजपर्यंत आम्ही असा प्रकोप बघितला नसल्याचे वयोवृद्ध नागरीक सांगत आहेत. एवढी भयावह स्थिती येवूनही शासनाकडून कोणतीही मदत नाही. निसर्गाचे हे दृष्टचक्र मागील पाच वर्षापासून सतत सुरु आहे. कधी पाणी येते तर पिक नष्ट करून जाते. तर कधी पाण्याविना पिके वाया जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
मात्र यावर्षी पाण्याविना पेरण्या खोळंबल्या आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी अकाली पाऊस तर कधी महापूर. याचा सामना बळीराजा करीत आहे. यामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगरात सापडत आहे. आज ना उद्या निसर्ग साथ देईल या आशेवर शेतकरी शेती करीत आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी भारनियमनाचा सामना करीत रोवणी करण्यासाठी कामाला सुरुवात केली. रोवणी तर झाली मात्र भारनियमनाचा भुताने पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. जमिनीला भेगा पडत आहेत.
धानपिक वाचविण्यासाठी बळीराजाची सर्वत्र धावपळ सुरु आहे. निसर्गाचा लहरीपणा आड येत आहे. कोरडवाहू शेतकरी तर हातावर हात धरून बसला आहे. आज ना उद्या पाऊस येईल म्हणून वाट पाहत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे रोवणी झाली त्यांना पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. अशा या निसर्गाच्या दृष्टचक्रातून बळीराजा केव्हा मुक्त होणार? असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. (वार्ताहर)