ज्येष्ठ झाडीपट्टी कलावंत शाहीर बुधाजी भलावी यांचे विक्रोळीजवळ पहाटे निधन
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 3, 2025 16:59 IST2025-12-03T16:58:20+5:302025-12-03T16:59:18+5:30
Bhandara : राज्य सरककारच्या कलावंत गौरव पुरस्कारासाठी जाताना वाटेतच काळाने गाठले

Veteran Jadipatti artist Shahir Budhaji Bhalavi passed away early this morning near Vikhroli.
भंडारा : राज्य सांस्कृतिक कला संचालनालयाकडून मुंबई येथे आयोजित कलावंत गौरव पुरस्कारासाठी जाताना भंडारा जिल्ह्यातील दहेगाव (ता. लाखांदूर) येथील ज्येष्ठ झाडीपट्टी कलावंत शाहीर बुधाजी भलावी (७८) यांचे मार्गातच विक्रोळीजवळ आज पहाटे ५:४५ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते आपल्या कुटुंबियांसह कारने दहेगावहून निघाले होते.
विक्रोळी येथील आदी आरोग्यम् या रुग्णालयात उपचारानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन करून पार्थिव त्यांच्या स्वगावी शववाहिकेने पोहचविले जाणार आहे. त्यानंतर दहेगाव येथे गुरूवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबई येथील रविंद्र नाट्य कलामंदिरामध्ये हा समारंभ बुधवारी सायंकाळी होणार आहे. त्यात राज्यातील ८४ ज्येष्ठ व युवा कलावंतांचा सन्मान होत आहे. बुधाजी भलावी यांना खडी गंमत या कला प्रकारासाठी ज्येष्ठ कलावंत म्हणून ३ लाख रुपयांचा पुरस्कार आणि सन्मानचिन्हाने सन्मानित केले जाणार होते.
कलगी-तुरा या कलाप्रकारात शाहीर बुधाजी भलावी यांचे मोठे नाव होते. तुर्रा शाखेचे ते ज्येष्ठ व नामवंत शहीर होते. ‘बुधा शाहीर’ या नावाने ते विदर्भासह महाराष्ट्रात व मध्यप्रदेशात लोकप्रिय होते. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे दर्शन घडवत मनोरंजनाची एक वेगळी दिशा दिली होती.