भाज्या महागल्या, पिशवी रिकामीच
By Admin | Updated: July 16, 2014 23:55 IST2014-07-16T23:55:48+5:302014-07-16T23:55:48+5:30
पावसाळा कोरडा जात असल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किंमतीत बेशुमार वाढ झाली. पावसाअभावी पिकावर संकट आल्यामुळे विक्रेत्यांना बाहेरील जिल्ह्यातून भाज्या खरेदी कराव्या लागत आहे.

भाज्या महागल्या, पिशवी रिकामीच
भंडारा : पावसाळा कोरडा जात असल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किंमतीत बेशुमार वाढ झाली. पावसाअभावी पिकावर संकट आल्यामुळे विक्रेत्यांना बाहेरील जिल्ह्यातून भाज्या खरेदी कराव्या लागत आहे. सध्या टमाटर व हिरवी मिरची प्रती किलो ६० रूपये दरात विक्री जात असल्याने सर्वसामान्याच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.
यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पाऊस आला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. सिंचनाअभावी शेतातील भाजीपाला सुकत असल्याचे सांगितले जाते. इतर जिल्ह्यातून महागड्या भाजीपाला विक्रीला येत आहे.
सध्या भाजी बाजारातील वाढलेल्या किंमती ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या येत आहे. येथे टोमॅटो हिरव्या मिरची ६० रूपये प्रती किलो आहे. गव्हार व चवळीच्या शेंगांचा दर ४० रूपये प्रति किलो आहे. भाजीबाजारात ३५ ते ४० रूपये दरात वांगे-भेंडी विकली जात आहे. तसेच आलू, कांदे, लसून, आले, भोपळा अशा सर्वच भाज्यांचे भाव वधारलेले आहेत. बाजारात वाढलेले भाव पहाता गृहिनींना पर्यायी उपायांकडे लक्ष वळवावे लागत आहे.
सर्वसाधारण नागरिकांना रोज महागडी भाजी खरेदी करणे परवडणारे नाही. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या महिन्यांचा हिशोब बिघडत आहे. भाजीपाला विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही. थोडीफार बचत करून अन्य खर्च भागविण्याकडे गृहिणीचा कल दिसतो. सध्या भाजी बाजारातील भाव वाढ सर्वांसाठी त्रासदायक ठरणारी आहे. (प्रतिनिधी)