रस्ता कामावर नदीपात्रातील दगडांचा उपयोग
By Admin | Updated: September 14, 2014 23:53 IST2014-09-14T23:53:06+5:302014-09-14T23:53:06+5:30
सुकळी (दे) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि.मी. रस्ता खडीकरणाच्या कामासाठी वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून वापरण्यात येत आहे. ठिकठिकाणी या दगडांचे ढिग पडले आहेत.

रस्ता कामावर नदीपात्रातील दगडांचा उपयोग
२२ लक्ष निधीचा रस्ता : खनिकर्म, महसूल प्रशासन गप्प, १११ ट्रॅक्टर दगडांचा केला पंचनामा
तुमसर : सुकळी (दे) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि.मी. रस्ता खडीकरणाच्या कामासाठी वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून वापरण्यात येत आहे. ठिकठिकाणी या दगडांचे ढिग पडले आहेत. २२ लक्ष रूपयांच्या रस्ता बांधकामावर नदीपात्रातील दगडांची वाहतुक करून कामे करण्यात येत आहे. येथे गैरव्यवहार, नियमबाह्य काम व दगडांची उचल करणे सुरु आहे.
यासंबंधी चार ग्रामपंचायत सदस्यांनी प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, खनिकर्म अधिकारी तथा तहसीलदारांकडे केली. परंतु अजूनपर्यंत चौकशी झाली नाही. सरपंच व ग्राम पंचायत सचिवावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत सुकळी (दे.) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि.मी. चा रस्ता सुकळी ग्रामपंचायतीमार्फत करणे सुरु आहे. २२ लाखाचा निधी येथे मंजूर झाला आहे. दोन टप्प्यात खडीकरणाचे काम करण्यात येत आहे. या रस्त्यावर वैनगंगा नदी पात्रातील मोठे दगड जमा करून (मजुरांकडून) रस्ता कामावर त्याचा सर्रास वापर करणे सुरु आहे. नदीपात्रात मजूर हे दगड गोळा करतात मोठ्या दगडांना उचलून ट्रॅक्टरमध्ये भरले जाते व नंतर रस्त्याच्या शेजारी त्यांचा ढिग टाकला जात आहे. मोठ्या दगडांना रस्त्यावर फोडून त्यांचे ४० ते ८० एम.म. दगड तयार केले जात आहे .जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून हा निधी येथे प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य विकास ठवकर, अनिल बुद्धे, गीता चौधरी, नलू चौधरी, रविंद्र सार्वे, राधेश्याम डोळस व इतर ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. दोन दिवसापूर्वी मंडळ अधिकारी क्षीरसागर आले होते. त्यांनी पंचनामा केला. १११ ट्रॅक्टर दगड रस्त्यावर पडून असल्याचे नमूद केले आहे. सविस्तर अहवाल प्राप्त झाला नाही. सुमारे १५ ते २० दिवसापासून नदीपात्रातील दगडांची उचल करून रस्त्याशेजारी ढीग तयार केला जात आहे. परंतु स्थानिक तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही.
या संदर्भात पाच दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ता योगेश्वर प्रेमलाल बुराडे (२३) यांनी माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती विचारणार असल्याचे कळल्यावर सरपंच भाऊलाल बांडेबुचे यांनी बुराडे यांना रात्रीच्या सुमारास गावातील चौकात मारहाण केली होती. या संदर्भात बुराडे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात बांडेबुचे याची तक्रार केली होती. परंतु मोहाडी पोलिसांनी सरपंच बांडेबुचे यांचे बयान घेतले नाही असा आरोप केला आहे.
तुमसर मुख्यालयापासून अवघ्या आठ कि.मी. अंतरावर सुकळी गाव आहे. जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, तहसीलदारांचे येथे लक्ष का गेले नाही असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. सरपंच व सचिवावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)