अटकेच्या भीतीने म्होरक्या भूमिगत
By Admin | Updated: September 13, 2014 23:39 IST2014-09-13T23:39:01+5:302014-09-13T23:39:01+5:30
वाघ व बिबट कातडीच्या तस्करीत वन विभागाला आवश्यक असलेला मुख्य आरोपी अटकेच्या कारवाईच्या भीतीपोटी भूमिगत झाला आहे. यामुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली असून आता डब्ल्यूसीसी

अटकेच्या भीतीने म्होरक्या भूमिगत
वाघाची कातडी प्रकरण : डब्ल्यूसीसी करणार अटकेची कारवाई
प्रशांत देसाई - भंडारा
वाघ व बिबट कातडीच्या तस्करीत वन विभागाला आवश्यक असलेला मुख्य आरोपी अटकेच्या कारवाईच्या भीतीपोटी भूमिगत झाला आहे. यामुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली असून आता डब्ल्यूसीसी अटकेची कारवाई करणार आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदेसह वन्यप्राण्यांची संख्याही जास्त आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ व ओडिशा येथील काही शिकारी टोळ्यांनी वन्यप्राण्यांना आपले लक्ष केले आहे. मागील काही दिवसात वन्यप्राण्यांच्या शिकारींच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात वाघांची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शिकार झालेल्या वाघांची कातडी विकणाऱ्या अनेकांना वनविभागाने अटकेची कारवाई केली. अशाच एका कारवाईत वाघाच्या कातडीसह भंडारा जिल्ह्यात तस्करांना पकडले होते. त्यांच्या माहितीवरून ओडिशातील नवरंगपूर जिल्ह्यातील हनमंतू साहूच्या अटकेची कारवाई २९ आॅगस्टेला करण्यात आली होती. हनमंतूचा ९ सप्टेंबरपर्यंत वनकोठडीत ठेवण्यात आले होते. यावेळी त्याने, 'त्याचा वाघ कातडीत सहभाग नाही' असे सांगितले होते. वाघ कातडीचा मुख्य आरोपी एका राजकीय पक्षाचा पुढारी असून त्याचे नाव माजी व अन्य एकाचे गणेश गौडा असल्याचे वनविभागाला सांगितले.
हनमंतूच्या सांगण्यावरून वन विभागाने माजीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला होता. त्याने अटकेमुळे परिसरातील गावात राजकीय प्रतिमा मलिन होईल, असे कारण पुढे करून स्वत: वनविभागापुढे आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. त्याच्या भुलथापाला वनविभाग बळी पडला व अटकेची कारवाई करण्याऐवजी त्याची वाट बघत बसले होते. दरम्यान हनमंतुच्या वनकोठडीची मुदत संपली व त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार असल्याने त्याची बहिण भेटायला भंडारा येथे आली होती. वनाधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन वाघ कातडीच्या तस्करी प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी तिनेही माजी व गौडाचे नाव घेतल्याचे समजते. ती गावाला पोहचल्यावर वनविभागाने माजीशी पुन्हा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्याने भंडारा येथे जात असल्याचे सांगितले व घरून निघाला. मात्र अटकेची कारवाई होणार असल्याने माजी भुमिगत झाला आहे.
वनविभाग तीन दिवसांपासून माजीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याचा भ्रमणध्वनी बंद असल्याची माहिती मिळत आहे. वनविभागाच्या 'थांबा, आरोपी येत आहे' या भुमिकेमुळे त्याला फरार होण्याची संधी मिळाली. वनविभागाने वेळीच अटकेची कारवाई केली असती तर माजी वनविभागाच्या ताब्यात असता. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्युसीसी) ही पंतप्रधानांच्या अखत्यारित काम करणारी संस्था असून त्यांच्या नेतृत्वात माजी व गौडाला अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. राज्याची डब्ल्युसीसी ओडिशातील बोर्डाशी संपर्क साधुन त्यांच्या सहकार्यातून माजी व गौडाला अटकेची कारवाई करणार आहेत. फरार दोघांनाही ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहे. लवकरच दोघेही वन विभागाच्या जाळ्यात अडकणार असल्याचा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. याबाबत सहायक उपवनसंरक्षक (भरारी पथक) अधिकारी विनय राठोड यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला.