Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातील दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:16 IST2020-04-18T12:16:19+5:302020-04-18T12:16:46+5:30
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल दोघांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या दोघांच्याही घशातील स्वॉबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातील दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल दोघांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या दोघांच्याही घशातील स्वॉबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालांची प्रतीक्षा असून अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. एकाला मधुमेह आणि निमोनिया तर दुसऱ्याला उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा आजार असल्याने गुरूवारी आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगितले.
येथील सामान्य रुग्णालयाच्या आयसोलशन वॉर्डात शुक्रवारपर्यंत २१ रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५० वर्ष आणि ७० वर्ष वयोगटातील दोघांचा मृत्यू झाला. एकाचा मृत्यू रात्री दहा वाजता तर दुसºयाचा मृत्यू मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाला. ७० वर्षीय व्यक्ती हा तुमसर तालुक्यातील असून तो खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. गुरूवारी त्याला येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. त्याला उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा आजार तसेच सर्दी आणि खोकला होता. ५० वर्षीय व्यक्ती हा भंडारा तालुक्यातील असून तो मधुमेह आणि निमोनियाने ग्रस्त होता.
दोघेही आयसोलेशन वॉर्डात दाखल असल्याने त्यांच्या घशातील स्वॉबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त होईल आणि त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात एकही कारोनग्रस्त रुग्ण नसून जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभावी उपाययोजना केल्या जात आहे.