ताडपत्री न झाकता रेती वाहतूक

By Admin | Updated: March 14, 2015 00:54 IST2015-03-14T00:54:49+5:302015-03-14T00:54:49+5:30

तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भंडारा, नागपूर आदी ठिकाणी रेतीची वाहतूक केली जात आहे. यामध्ये रेती वाहतुकदारांकडून शासन नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.

Traffic Without Tadpreet | ताडपत्री न झाकता रेती वाहतूक

ताडपत्री न झाकता रेती वाहतूक

लाखांदूर / मोहाडी : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भंडारा, नागपूर आदी ठिकाणी रेतीची वाहतूक केली जात आहे. यामध्ये रेती वाहतुकदारांकडून शासन नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. ताडपत्री न झाकता रेती वाहतूक करण्यात येत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
ट्रॅक्टर किंवा ट्रकच्या मागील टपात रेतीची वाहतूक होते. त्यावर ताडपत्री झाकून रेतीची वाहतूक करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र मोहाडी, लाखांदूर शहरात हे नियम पायदळी तुडविले जात आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जून २००२ मध्ये परिपत्रक निर्गमित करुन गौण खनिजाची वाहतूक करताना ट्रक व ट्रॅक्टरच्या पल्ल्याची उंची वाढवून ताडपत्री झाकण्याचे निर्देश आहेत. ताडपत्री लावणे तर दूरच परंतु पल्ल्याची उंची वाढवून क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेण्याचा प्रकार सुरू आहे. परिणामी ट्रॅक्टर, ट्रक यांच्यामागून येणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेती घाटाचा लिलाव झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना सिमांकन करुन रेतीचे उत्खनन करण्यासाठी सांगितले जाते. मात्र येथील कंत्राटदार सीमांकनापलीकडे रेतीचे उत्खनन करीत आहे.
यासंदर्भात नदी काठच्या नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अनेकवेळा वाहन चालक वाहतूक परवाना न बाळगता गौण खनिजाची वाहतूक करीत आहेत. अशारीतीने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचे परवाने रद्द करुन त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. मात्र सर्वकाही आलबेल सुरु आहे.
गौण खनिजाच्या बाजार मुल्याच्या तीनपट दंड ठोठावण्यात यावा व अशा वाहनाचा परवाना सहा महिने निलंबित करण्यात यावा, असेही शासन निर्णयात नमूद आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला प्रशासनाकडे वेळ नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Traffic Without Tadpreet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.