पोहायला जाणे जीवावर बेतले; मुरुमाच्या खाणीत तीन मुलांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 21:57 IST2022-08-29T21:57:12+5:302022-08-29T21:57:35+5:30
गावालगतच्या मुरुमाच्या खाणीत (बोडी) पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील अत्री येथे सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पोहायला जाणे जीवावर बेतले; मुरुमाच्या खाणीत तीन मुलांना जलसमाधी
भंडारा : गावालगतच्या मुरुमाच्या खाणीत (बोडी) पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील अत्री येथे सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
प्रणय योगिराज मेश्राम (१७), संकेत बालक रंगारी (१७) आणि साहिल नरेश रामटेके (१९) रा. अत्री ता. पवनी अशी मृतांची नावे आहेत. तिघेही मित्र असून सोमवारी दुपारी ते बाहेर गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी परत आले नाही म्हणून त्यांचा शोध सुरू झाला. तेव्हा गावाजवळ असलेल्या मुरूमाच्या खाणीजवळ कपडे आणि चप्पला पडून असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली.
या घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सुधीर बोरकुटे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अत्रीच्या पोलीस पाटील संगीता सेलोकर, खैरीचे पोलीस पाटील देविदास डोकरे, नवरगावचे पोलीस पाटील भीमराव लोणारे यांच्यासह गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. तासभरानंतर ८.३० वाजताच्या सुमारास तिघांचेही मृतदेह आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथे रवाना केले.
हे तिघेही दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुरुमाच्या खाणीत पोहायला गेल्याची माहिती आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मात्र आसपास कुणी नसल्याने अंदाज आला नाही. सायंकाळी मुले घरी का आली नाही म्हणून शोध सुरू झाला आणि रात्री त्यांचे मुरूमाच्या खाणीत मृतदेहच आढळले.
प्रणय आणि संकेत पवनी तालुक्यातील कोंढा येथील अरुण मोटघरे महाविद्यालयात ११ व्या वर्गात शिकत होते. तर साहिलने गतवर्षीच शाळा सोडली होती.