स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये लाऊड स्पीकरवरून प्रचार करण्यासाठी ठराविक वेळेचे असणार बंधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:29 IST2025-11-15T15:25:20+5:302025-11-15T15:29:49+5:30
प्रशासनाची करडी नजर : ध्वनीप्रदूषण आढळल्यास कारवाईचा इशारा

There will be a specific time limit for campaigning through loudspeakers in local body elections.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकाला निर्बंध असल्याने ध्वनिक्षेपकावरून प्रचार करताना संबंधितांना वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार, निवडणूक लढवणारे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या शांततेला व स्वास्थ्याला बाधा पोहोचण्याची व रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवली जाण्याची शक्यता असते. अशात निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपक वापरावर काही महत्त्वाचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनाला प्रतिबंध असेल.
निवडणूक प्रचार व प्रक्रियेवर वॉच
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन निवडणूक व प्रक्रियेवर वॉच ठेवून आहे. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रचार करताना काळजी घ्यावी.
पोलिस विभाग दक्ष
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेला कळविणे बंधनकारक राहील. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमलात राहतील. प्रत्येक व्यक्तीसाठी या आदेशाची अंमलबजावणी करणे शक्य नसल्यामुळे हे एकतफीं आदेश ध्वनिक्षेपकावर पोलिस विभागाने जाहीर करून प्रसिद्धी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.