जिल्ह्यात ५०० अधिकृत फटाका विक्रेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:14 IST2018-11-03T22:13:59+5:302018-11-03T22:14:31+5:30
फटाक्यांची आतिषबाजी आणि दिवाळी यांचे अनन्यसाधारण नाते आहेत. दिवाळीच्या काळात कोट्यावधी रुपयांच्या फटाक्यांची राखरांगोळी केली जाते. यातून प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात ५०० अधिकृत फटाका विक्रेते
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : फटाक्यांची आतिषबाजी आणि दिवाळी यांचे अनन्यसाधारण नाते आहेत. दिवाळीच्या काळात कोट्यावधी रुपयांच्या फटाक्यांची राखरांगोळी केली जाते. यातून प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात रात्री ८ ते १० या वेळातच फटाके फोडण्याचे निर्बंध घातले आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात फटाक्यांचे ५०० अधिकृत विक्रेते असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अमंलबजावणी करण्याचे मोठे आव्हान प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांपुढे आहे.
दिवाळीच्या काळात फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंद लुटण्याची भारतीय परंपरा फार जुनी आहे. दिवाळी म्हणजे फटाके आणि फटाके म्हणजे दिवाळी असे समिकरण आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांची मोठी विक्री केली जाते. दिवाळीत तर चौकाचौकात फटाक्यांचे दुकाने लागतात. यासाठी शासनाकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागतो. भंडारा जिल्ह्यात अधिकृत ४९९ परवानाधारक फटाका विक्रेता आहे. अनधिकृत फटाका विक्रेत्यांची संख्याही कमी नाही. सर्वाधिक भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१२ फटाका विक्रेता आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात या काळावधीत कोट्यावधी रुपयांचे फटाके विकले जातात. अलीकडे फॅन्सी फटाक्यांची धुम आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषा निर्माण होते. धूर आणि आवाजाच्या प्रदुषणाने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच फटाक्यांमुळे विविध अपघातही झाले आहेत. अनेकांचे डोळे कायमचे गेले आहेत. शासन स्तरावर जनजागृती करुनही कोणताच उपयोग झाला नाही. फटाक्याचे भारतीय मानसाचे वेड कमी होण्याचे चिन्हे दिसत नाहीत.
अशातच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात रात्री ८ ते १० या दरम्यानच फटाके फोडण्याचे बंधन घातले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रदुषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांकडे यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. परंतु दिवाळीच्या या आनंद सोहळ्यात कुणावर कारवाई कशी करावी, असा प्रश्नही त्यांच्यापुढे आहे. पंरतु कारवाई केली नाही तर न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनीच स्वत:हून निर्बंध घालून फटाके फोडण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या कालावधीतच आतीषबाजी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रदूषण मंडळाच्या कारवाईकडे लक्ष
न्यायालयाने प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी केवळ दोन तास फटाके फोडण्याचे आदेश दिले असले तरी याचा परिणाम फटका विक्रेत्यांवर दिसून येत नाही. दिवाळीचा सणाला फटाके फोडून आनंद साजरा करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. न्यायालयाने फटाके फोडण्यावर निर्बंध आणल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश आहेत. ही कारवाई प्रदूषण मंडळातर्फे करण्यात येणार आहे. मात्र येथील प्रदूषण मंडळ कार्यालयात रिक्त पदांची वाणवा आहे. किती जणांवर कारवाई होणार आता याकडे लक्ष आहे.