पूर्व विदर्भातील कुपोषणाचे चित्र भयावह ! भंडाऱ्यात ६३८ तीव्र, ३६५३ मध्यम कुपोषित बालके
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:40 IST2025-10-17T16:37:49+5:302025-10-17T16:40:31+5:30
Bhandara : राज्यभरात सुमारे ६ लाखांहून अधिक बालके कुपोषणाच्या श्रेणीत असून त्यापैकी ४.५ लाखांपेक्षा जास्त अतिकुपोषित आहेत, अशी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाची माहिती आहे.

The picture of malnutrition in East Vidarbha is frightening! 638 severely, 3653 moderately malnourished children in Bhandara
भंडारा : राज्यातील ग्रामीण व शहरी भागात कुपोषणाचे संकट अद्याप कायम असून पूर्व विदर्भातही या समस्येचे गांभीर्य दिसून येत आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ६३८ तीव्र कुपोषित, तर ३६५३ मध्यम कुपोषित बालके नोंदली गेली आहेत. कुपोषणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील काही भागांत अजूनही बालकांच्या पोषण स्थितीबाबत आव्हाने कायम आहेत.
राज्यभरात सुमारे ६ लाखांहून अधिक बालके कुपोषणाच्या श्रेणीत असून त्यापैकी ४.५ लाखांपेक्षा जास्त अतिकुपोषित आहेत, अशी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाची माहिती आहे. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण दारिद्र्य, अपुरा आहार व आरोग्यसेवांअभावी परिस्थिती गंभीर आहे.
विशेष म्हणजे, राज्य सरकारने या समस्येसाठी १४०० कोटींची तरतूद केली असून अंगणवाड्यांमार्फत पौष्टिक आहार, औषधोपचार आणि तत्संबंधी शिक्षणाद्वारे जिल्हा प्रशासनाने “कुपोषणमुक्त भंडारा” अभियान राबवण्यास गती दिली आहे. आरोग्य, महिला आणि बालकल्याण विभागाने त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत सकस आहार, जनजागृती आणि उपचार यावर भर दिला आहे. अंगणवाडी केंद्रांद्वारे मातांना स्तनपानाविषयी प्रशिक्षण देण्यात येते, तर तीव्र कुपोषित बालकांना व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये दाखल करून अन्नपूरक आहार व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
भंडारा जिल्ह्यातील अशी आहे आकडेवारी
भंडारा जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, भंडारा तालुक्यात १२८, लाखनीत १४३, साकोलीत ८०, तुमसरमध्ये ६१, लाखांदूरमध्ये ८५ आणि मोहाडी तालुक्यात ४८ बालके तीव्र कुपोषित अवस्थेत आहेत. तर, सर्वाधिक १०६० मध्यम कुपोषित बालके भंडारा तालुक्यात असून त्यापाठोपाठ लाखनी (६२४), तुमसर (४१३), लाखांदूर (३८५), साकोली (३६१) आणि मोहाडी (१०६) अशी नोंद आहे.
"आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे एकही बालक कुपोषित राहू नये, यासाठी विशेष पावले उचलली आहेत. कुपोषणाच्या श्रेणीतून बालकांना बाहेर काढण्यावरच आमचा मुख्य भर राहणार आहे."
-संजय झोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद, भंडारा.