हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 20, 2025 21:18 IST2025-07-20T21:18:26+5:302025-07-20T21:18:51+5:30

Bhandara News: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून धावत सुटलेल्या हरिणाने सैरभैर होत चक्क उड्डाण पुलावरूनच उडी घेतली. यात त्याचा जागीच अंत झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा (जवाहरनगर) येथे अर्बन बँकेपुढे रविवार, २० जुलैला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.

The deer scattered, ran wildly along the highway, jumped off the bridge, met a tragic end. | हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत

हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत

-गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून धावत सुटलेल्या हरिणाने सैरभैर होत चक्क उड्डाण पुलावरूनच उडी घेतली. यात त्याचा जागीच अंत झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा (जवाहरनगर) येथे अर्बन बँकेपुढे रविवार, २० जुलैला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हे हरिण राष्ट्रीय महामार्गवरील उड्डाण पुलावरून धावत होते. या वेळी मार्गच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाहतूकही सुरू होती. या वाहतुकीमुळे ते घाबरले. पुढे धावत जाण्याखेरीज अन्य दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे त्याने थेट उड्डाण पुलावरून खाली उडी घेतली. मात्र उंची अधिक असल्याने त्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी जवाहरनगर पोलिसांना आणि वन विभागाला ही माहिती दिली. वनविभागाचे पथक व पोलिस घटनास्थळी पोहचले. वनपाल अंजन वासनिक व वनरक्षक सिरीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रॅपिड रेस्क्यू टीमचे निशी वानखेडे व वाहन चालक रतन गजभिये यांना उपस्थित वाहतूक पोलिस ज्ञानेश्वर हाके व नागिरकांनी मृत हरिणाला वाहनात टाकून भंडारा पशुवैद्यकीय रुग्णालयात रवाना केले. मृत हरिणाचे वय सुमारे दोन वर्षांचे असल्याचा अंदाज वनविभागाच्या पथकाने व्यक्त केला आहे.

महामार्गावर धावणाऱ्या हरिणाचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, सायंकाळी ३:३० ते ४ वाजताच्या सुमारास ठाणा पेट्रोल पंपजवळील राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या एका हरिणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात, हे हरिण महामार्गावरून सुसाट धावत असून एका क्षणी ते डिव्हायडरवरून दुसऱ्या लेनवर उडी घेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओतील हरिण आणि मृत झालेले हरिण एकच आहे की वेगळे हे कळू शकलेले नाही. नागपूरकडून भंडाराकडे येणार्या एका वाहनचालकाने हा व्हिडीओ काढून समाज माध्यमांवर टाकला.

Web Title: The deer scattered, ran wildly along the highway, jumped off the bridge, met a tragic end.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.