४० हजारांची लाच घेताना जि.प. उपअभियंत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:26 IST2025-03-01T12:23:53+5:302025-03-01T12:26:23+5:30

Bhandara : जलशुद्धीकरण कामाचे बिल काढण्यासाठी केली होती ५ टक्क्यांची मागणी

Taking a bribe of 40 thousand, Z.P. Deputy Engineer arrested | ४० हजारांची लाच घेताना जि.प. उपअभियंत्याला अटक

Taking a bribe of 40 thousand, Z.P. Deputy Engineer arrested

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जलशुद्धीकरण केंद्रातील दोन कामांचे बिल काढण्यासाठी ५ टक्के कमिशनची मागणी करणाऱ्या व त्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रभारी उपअभियंत्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. सुहास पांडुरंग कुरंजेकर (५१ वर्षे) असे या वर्ग दोनच्या प्रभारी उपअभियंत्याचे नाव असून तो जिल्हा परिषदेच्या जलसंपदा यांत्रिकी विभागात कार्यरत आहे.


एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय कंत्राटदाराने चिखली आणि लेंडेझरी या दोन गावांतील जलशुद्धीकरण संदर्भातील कामे पूर्ण केली आहेत. या कामाचे ९ लाख ८० हजार रुपयांचे बिल त्यांनी विभागाकडे सादर केले. ते मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, दोन्ही ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, वर्क ऑर्डर, कामाचे फोटोग्राफ आदी कुरंजेकर याच्याकडे सादर केले. या संदर्भात कंत्राटदाराने १७फेब्रुवारीला त्याची भेट घेऊन बिलाबाबत विचारणा केली. मात्र या कामाच्या बिलावर सही करून बिल मंजूर करण्यासाठी एकूण रकमेच्या ५ टक्के कमिशनची अर्थात ४९ हजार रुपयांची मागणी केली.


कमिशनच्या नावाखाली लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कंत्राटदाराने २५ फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या संदर्भात पंचासमक्ष पडताळणी केली असता उपअभियंता कुरंजेकर याने तडजोड करून ४० हजार रुपयांची मागणी पंचासमक्ष केल्याचे तपासात पुढे आले. यावरून सापळा रचून शुक्रवारी ही रक्कम देण्याचे ठरले. नियोजनानुसार, सुहास कुरंजेकर याने पंचासमक्ष कंत्राटदाराकडून ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. यादरम्यान त्याला अटक करण्यात आली. भंडारा पोलिसात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सक्षम अधिकारी या नात्याने जलसंपदा विभागाचे मंत्रालयातील सचिवांनाही हा प्रकार कळविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडाऱ्याचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांनी भडारा पथकासह ही कारवाई केली. 


घराची झडती...
या कारवाईनंतर पथकाने उपअभियंत्याच्या घराचीही झडती सायंकाळी सुरू केली. वृत्त येईपर्यंत ही तपासणी सुरूच होती. अधिक चौकशीसाठी त्याचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आला आहे.

Web Title: Taking a bribe of 40 thousand, Z.P. Deputy Engineer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.